५ जानेवारी २०२५ रोजी ग्रंथ प्रकाशन सोहळा, सायंकाळी ४ ते ८ या वेळात गांधी भवन, कोथरूड येथे अतिशय सुंदर आखीव रेखीव असा संपन्न झाला. दिव्योन्मेष सत्संगातील सर्व साधकांनी, स्वागत कक्षापासून स्टेजव्यवस्थेपर्यंत सर्व तयारी स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार अगदी मनापासून केली होती.
कार्यक्रमाच्या दालनात प्रत्येक निमंत्रिताचे अत्तर लाऊन, चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून प्रसन्न स्वागत करण्यात येत होते. उत्तम चविष्ट अशा अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन प्रत्येकजण आनंदाने ग्रंथांची नेटकी मांडणी केलेल्या कक्षात दाखल होत होता. सर्व ग्रंथांची माहिती वाचत, स्वामी स्वरूप स्वानंद यांनी त्यांचे सद्गुरू परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, पावस यांना समर्पित केलेल्या, नवग्रंथहाराचे सुंदर असे पोस्टर बघत पुढे मुख्य दालनात प्रवेश करत होता...
दालनात सुरुवातीला साकारलेली अप्रतिम फुलांची सजावट आणि ग्रंथाची उत्कृष्ट अशी प्रतिकृती बघून काही क्षण तिथे थांबण्याचा मोह कोणालाच आवरता येत नव्हता... समोर असलेल्या नेटक्या पद्धतीने सजवलेल्या स्टेज व्यवस्थेला LED स्क्रीनमुळे एक भव्यता प्राप्त झाली आणि स्क्रीनवरून प्रक्षेपित होणाऱ्या आत्मपाठ आणि साधनाक्रम ह्यांच्या व्हिडिओज मुळे अध्यात्मिक वातावरण निर्मिती आपोआप होत होती. स्थानापन्न झालेला प्रत्येक निमंत्रित त्यात समरस होत होता.
अशा प्रसन्न वातावरणात टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचे आगमन झाले.. दिव्योन्मेष सत्संगाचा तपपूर्तीचा प्रवास सांगणारी एक छोटी चित्रफित दाखवण्यात आली आणि दीपप्रज्वलनानंतर मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले.
मान्यवरांची ओळख व सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवरांची मनोगते नि:शब्द शांततेत ऐकली गेली, अगदी मनापासून मनापर्यंत पोहचली.
माननीय कल्याणीताई नामजोशींनी ग्रंथ समजून घेण्यास अवघड असला तरी एकाग्रतेने हे साध्य होऊ शकेल असे सांगत, त्याच्या वाचनासाठी, अभ्यासासाठी आवश्यक असणारी मानसिकता तयार केली.
स्वामी स्वरूप स्वानंद यांनी आपल्या मनोगतात या ग्रंथाच्या अभ्यासकांनी जीव, जगत, जगदीश्वर ही मायाशक्तीची लीला म्हणजेच हा ऐश्वर्ययोग समजून घेण्यासाठीच मानव जन्म कसा आहे हे जरूर अभ्यासावे हे सांगितले.
प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती, फुलगाव यांच्या अत्यंत मनोवेधक मनोगताने श्रोतृवृंद एकाग्र चित्त झाला. सर्व मान्यवरांचे मनोगतांमधील विचार हे एकाच सुत्रात बांधलेले असणं सामान्य मुमुक्षुंसाठी प्रत्ययकारी होते.
उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद, सहभाग आणि शिस्त लक्षणीय होती.
सत्संगातील विविध समित्यांनी नेमून दिलेले काम अतिशय तन्मयतेने आणि चोख पार पाडून सोहळा यशस्वी केला. सर्वचजण नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
अतिशय दिमाखात संपन्न झालेला हा सोहळा सर्व साधकवर्ग आणि उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.
एका सुंदर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
(दिव्योन्मेष सत्संग साधक)