साधनाक्रम

साधनाक्रम

साधनाक्रम व्हिडिओ

मानसपूजा

|| आळवणी ||

घ्या हो स्वामी स्वरूप नाथा, निजभक्ता जवळी |
कृपाकटाक्षे, प्रेमेभरोनी, माता मज कुरवाळी ||

देहबुद्धीने प्रार्थनेतुनी, तुजला हाकारितो |
कर्म-भक्ती तथा ज्ञान समर्पूनि, तुलाच साकारितो ||

तव वचनी मी ठेवून निष्ठा, साधन ते करतो |
तव आठवणीने चित्त भरोनी, भावपुष्प ठेवतो ||

सोहम साधनी अजूनही वृत्ती, अनुसंधित ना होते |
अनुतापाच्या भाव गतीतून, अश्रुपात ते करिते ||

चित्त शुद्धीच्या वास्तवातुनी, तुजला मी प्रार्थितो |
आत्मबुद्धीच्या स्वरूपासाठी, जीवा तळमळीतो ||

आशिर्वचनी मज पूर्ण भरवसा, समाधानी राहतो |
ज्ञानेशाला वंदन करुनी, तुलाच रे पाहतो ||

विश्वातीता, स्वरूपनाथा, निर्गुणी तू असतो |
विश्वी राहुनी सगुणातूनी, सद्गुरू मी ध्यातो ||

सद्गुरू सोहम सिद्धा

|| सद्गुरू सोहम सिद्धा ||

संसार करुनी, बद्ध राहिलो आता |
मी कसा आळवू, सद्गुरू सोहम सिद्धा ||
मी कष्टीत होतो, मम इच्छां करीता |
मी झाकित होतो, मम दोषां सारखा |
का तुझ्या दर्शने चुकवू कसा प्रारब्धा ||…..
मी कसा आळवू सद्गुरू सोsहम सिद्धा |

का कमी तपे सरली, बांधीत तव पूजेला |
का नच केला आठव, नित्य स्मरोनी तुजला ||
जरी अडकत गेलो, बांधीत गेलो तव मंत्रा |
भाव विभोरचि होऊन बसलो, शोधित शुद्ध रूपा ||….
मी कसा आळवू , सद्गुरू सोsहम सिद्धा |

जव जाणीव होते, मजला गुरू मंत्राची |
मज आकल झाला, प्राप्त तव तंत्राची ||
नको उगाच सारू, दूर मम भक्तीला |
तू साद देऊनि जवळ करी रे रूद्रा ||…..
मी कसा आळवू, सद्गुरू सोsहम सिद्धा |

मी तुझ्या कृपेविण राहू कसा रे शेषा |
जरी न कळला मज, तव भाव निःशेषा ||
तू उचलून घेई योग्य न जरी तव भक्ता |
परी तूच माउली, जवळ करी रे निजभक्ता ||….
मी कसा आळवू ,सद्गुरू सोs हम सिद्धा |

जा श्वासांनो घेऊन जा

|| जा श्वासांनो घेऊन जा ||

जा श्वासांनो घेऊन जा, हा मंत्र शिरावरती |
मन-बुद्धीला बांधुनी, गुरुस्थाना सरशी ||

अज्ञ स्वरूपी लक्ष बांधुनी, लक्ष्य ठेवूनि अलक्ष्य |
विश्वस्वरूपी निर्गुणी राहुनी, सगुण करावे भक्ष्य ||

नाभी हेच हरिद्वार समजुनी, करी साधनेस सुरुवात |
हिच साधना सतत सांगतसे, सद्गुरू जोजावीत ||

परे मधुनी उन्मेषीत होई, सोहम हाचि ओंकार |
आज्ञाचक्री वाट पाहतसे गुरू, तोचि करी स्वीकार ||

तंत्र शिकोनी मंत्र जाणुनी, करी सोsहम ध्यान |
चिदाकाशी शून्य स्थळी, मिळेे ब्रह्म ज्ञान ||

निःशून्याच्या पोटी सरे, पूर्ण विश्व अंधार |
प्रकाशपुरीत मन बुद्धीचा, सरे सर्व संग्राम ||

नि:स्पंदातून स्पंदीत होऊन अधिमानसी रमला |
अवचित महाशून्यातून, विश्वातीती जगला ||

निरंजनाच्या मानसातून स्फुरतची होते एकत्व |
विविधतेतून साधित होते एकचि, सु-संवादीत्व ||

विशुद्ध सत्यातून स्थापित होता, विश्व व्यापक न्याय |
निर्दोषाच्या जाणिवेतून दूर करी अन्याय ||

विस्तृत मनाच्या प्रस्तुत जाणिवा, करी भाव विभोर |
गुरुकृपेचा लाघव पाहुनी, अश्रू दाटती घनघोर ||

सद्गुरू प्रार्थना

|| सद्गुरू प्रार्थना ||

गुरुराया मज, धरावे आपण,
मार्गी लावा मज, साधनी या || धृ ||

मन – बुद्धी – चित्त, न राही हो स्वस्थ,
कैसे प्राप्त होई, आत्मसुख ||

तव कृपेविण, न जाई ‘मी’ पण,
स्वस्थता न येई, ध्यानी या ||

सोsहम बोधे तव, लाविला हा छंद,
वृत्ती करा स्थिर तव कृपा बळे ||

अनुतापा अंगे, भिजोनिया गेलो,
घ्या हो भक्ता आता, जवळी या ||

कृतार्थ जीवन

|| कृतार्थ जीवन ||

तुजलागी संप्रदाये करोन
समंत्र सांगितले सहज-साधन
नित्य नेमे आसनी बैसोन
करावे चिंतन स्वरूपाचे || १ ||

स्वरूप चिन्मय आनंदघन
आपणही तैसेची परिपूर्ण
ऐसे भाविता तन्मय होवोन
मनासी मनपण उरे कोठे? || २ ||

उरे कोठे द्वैत-स्थिती
देह-गेह-जगत्-भ्रांती
क्षणैक अद्वयानंदानुभूती
देतसे शांती साधकासी || ३ ||

साधकासी पुनरपि भवप्रत्यय
होता नाना वृतींचा उदय
सोSहम् स्मरणे धरावी सोय
नित्यानित्य विवेकाची || ४ ||

विवेकाचा घेवोनी आधार
साक्षित्वे करावे सर्वहि व्यापार
सुखदुःखे प्रारब्धानुसार
भोगावी साचार यथाप्राप्त || ५ ||

प्राप्तकर्माचरणी निपुण
भक्ति-ज्ञाने सुसंपन्न
अखंड करी सोsहम् ध्यान
कृतार्थ जीवन होय त्याचे || ६ ||

साधक उपदेश

|| साधक उपदेश ||

नाभी पासून ब्रह्मरंध्रात
सोsहम् ध्वनि असे खेळत
तेथे साक्षेपे देऊनि चित्त
रहावे निवांत घडिघडि || १ ||

घडिघडि करावा विवेक
देहादि प्रपंच मायिक
सत्य नित्य शाश्वत एक
असे निःशंक आत्मरूप || २ ||

आत्मरूपी दृढ विश्वास
आत्माचि मी हा निदिध्यास
सक्षित्वे साहोनि सुख दुःखास
करावा अभ्यास नित्यनेमे || ३ ||

नित्यनेमे सिध्द स्मरण
करावे भावे सोsहम् ध्यान
चालता बोलता अनुसंधान
प्रयत्ने करोन असो द्यावे || ४ ||

असो द्यावे चित्त प्रसन्न
भगवंती निष्ठा पूर्ण
तो संकटी सत्वर धावोन
देई संरक्षण निजभक्ता || ५ ||

निजभक्ता घेवोनि जवळी
कृपा-कटाक्षे कुरवाळी
जेथीचा तेथे नेवोनि घाली
आनंदमेळी स्व-रूपाच्या || ६ ||