रामगड येथे योगी अरविंद यांच्या आश्रमात २०१९ आणि २०२२ मधील मे महिन्यात शिबीरे आयोजित करण्यात आली होती. योगी अरविंद यांच्या तत्वज्ञानाला अनुसरून शिबीरांमधील विषयांची आखणी केलेली असते. २०१९ साली आयोजित शिबीरात स्वामी स्वरूप स्वानंद यांनी योगी अरविंद यांचे LIFE DIVINE आणि SYNTHESIS OF YOGA हे विषय निवडले होते तसेच सुहासिनी देशपांडे यांनी योगी अरविंद यांचे चरित्र उलगडून विदित केले व श्री. राजेंद्र बेलवलकर यांनी सावित्री या महाकाव्याविषयी आपले विचार मांडले.
२०२२ मधील शिबीरात सर्वच लेक्चर्समध्ये स्वामी स्वरूप स्वानंद यांनी हे तत्वज्ञान खूपच अभ्यासपूर्ण रितीने मांडले. ह्या रामगड शिबीराची आखणीच जणू “दिव्य जीवनासाठी समन्वय” ह्या दृष्टीतून त्यांनी केलेली होती. योगी अरविंद यांचे मूळ लेखन ENGLISH मध्ये आहे , स्वामी स्वरूप स्वानंद यांनी त्यांच्या संकल्पना मराठीत मांडल्या. रामगडच्या निसर्गरम्य वातावरणात, स्वामी स्वरूप स्वानंद यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतून योगी अरविंद यांचे तत्वज्ञान श्रवण करणे, हा दुग्ध शर्करा योग काही साधकांनी दोन्हीही शिबीरांना उपस्थित राहून अनुभवला आहे.
(२५ ते २८ डिसेंबर २०२१)
पुण्यापासून साधारण अडीच तासाच्या अंतरावर असलेल्या, श्री. राजकुमार तिवाटणे यांच्या राज ऍग्रो टुरिझम ह्या फार्म हाऊस येथे हे शिबीर संपन्न झाले. ध्यान अभ्यास वर्ग या विषयावर हे शिबीर घेण्यात आले. ध्यान अभ्यास वर्ग उत्तम रितीने झालाच तसेच एक विशेष प्रसंग सर्व शिबीरार्थींना अनुभवण्यास मिळाला. ध्यान अभ्यास वर्गाच्या पहिल्याच दिवशी गावातील हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि देवळाचे कळस आरोहणाचे अतिशय पवित्र असे कार्य स्वामी स्वरूप स्वानंद ह्यांच्या हस्ते करण्यात आहे.
स्वामी स्वरूपानंद ह्यांच्या साधनेने पावन झालेल्या पावस क्षेत्री दोनदा आध्यात्मिक शिबीर घेतले. तेथे स्वामी स्वरूप स्वानंद यांनी, स्वामी स्वरूपानंद यांच्या दोन रचना, वर-प्रार्थना व त्यांच्या आत्मानुभवातून स्फुरलेला नवरत्नहार, या काव्यांवर सुबोध विवेचन केले. तसेच गुरूगीतेमधील २७ निवडक श्लोकांचा अर्थ सांगून प्रबोधन केले. स्वामींना अभिप्रेत असलेल्या सोहम साधनेवर त्यांनी विवेचन केले. ही विवेचने स्वामीं चरणी, त्यांच्या समाधी स्थळी अर्पण केलेली सेवाच होती.
पावसचे शिबीर जेव्हा आयोजित होते तेव्हा तेथील अनुभूती वेगळीच असते. पावसचे ध्यान मंदिर, जिथे अतिशय निरव शांतता अनुभवास येते. मंदिराचा अतिशय सुंदर असा परिसर, समाधी मंदिर, अनंत निवास जिथे स्वामींनी आपल्या आयुष्याचा बराच कालखंड व्यतीत केला, तेथील त्यांची खोली, वापरातील वस्तू अतिशय काळजीपूर्वक जतन केल्या आहेत. पावस हे तीर्थक्षेत्रच आहे. स्वामी स्वरूपानंद यांचे चैतन्यमयी वास्तव्य तिथे अनुभवता येते.