उत्सव

गुरुपौर्णिमा उत्सव २१ जुलै २०२४

दि. २१ जुलै २०२४

दिव्योन्मेष सत्संगातर्फे यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव हा परमहंस नगर, कोथरूड, पुणे येथील, 'श्री गणेश कृपा हॉल' येथे संपन्न झाला. आकर्षक रंगावली आणि फुलांची सुंदर आरास...तसेच समस्त गुरुपरंपरेचे सजवलेले फ्लेक्स आणि प्रतिमा यांनी व्यासपीठ सुशोभित तसेच मोगऱ्याच्या गजऱ्यांनी सुगंधित झाले होते!

या मंगल दिनी, प्रथम, सत्संगातील १० भगिनींनी मिळून, परम पूजनीय स्वामीजींनी साकारलेल्या, निर्गुण जाणिवेतून अध्यात्माचे मूलसार समजाविणाऱ्या 'आत्मपाठा' चे गायन सादर केले. जवळपास तासभर सुरू असणाऱ्या या वाद्यवृंदासह गायनात, समस्त श्रोतेवृंद तल्लीन झालेला होता. प. पूज्य स्वामीजींची ही दैवी, अलौकिक व प्रासादिक रचना आणि तितकेच भावोत्कट गायन...यांमुळे संपूर्ण हॉलचे वातावरण भारलेले होते!

यानंतर,नाथपरंपरेतील सिद्धांचे तसेच आमचे परम पूजनीय गुरुमाऊली श्री स्वामी स्वरूप स्वानंद यांचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री गुरुगीता तसेच स्वामी स्वरूप स्वानंद यांची अष्टोत्तर शत नामावली ही सौ.स्मिता लिमये, श्रीमती अमिता मोये आणि जयंती यारगोप यांनी सादर केली.

गुरुपूजनाच्या कार्यक्रमानंतर, श्री गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून, प.पूज्य स्वामीजींनी ' आत्मपाठ पुस्तिके' चे प्रकाशन केले. याचबरोबर आत्मपाठातील काही निवडक ओव्यांचा सुंदर अर्थही सर्वांना समजावून सांगितला. श्री स्वामीजींचे प्रबोधन हे अतिशय ओघवते, मुद्देसूद, थेट आणि श्रोतेवर्गास मूळ अध्यात्माकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारे होते. सर्वसाधारणपणे, मनुष्य आपल्या जीवनात सद्गुरूंकडे, संतांकडे कोणत्या नजरेने बघतो आणि खरे पाहता, त्यांच्याकडून कोणत्या आध्यात्मिक लाभाची अपेक्षा आपण ठेवायला हवी, याचे अप्रतिम, वास्तववादी विवेचन स्वामीजींनी या दिवशी केलं. आत्मपाठाचा अर्थ काय, आत्मपाठाचे नुसता वाचन नव्हे; तर तो जीवनात आचरणात आणणे का महत्त्वाचे आहे; हेही त्यांनी समजावून सांगितले!! सगळेजण स्वामीजींना अतिशय मनापासून आणि उत्सुकतेने ऐकत होते. स्वामीजींचे हे प्रबोधन, युट्युब वरील दिव्योन्मेष सत्संगाच्या चैनल वर उपलब्ध आहे.

वरील सर्व कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने प्रक्षेपण देखील करण्यात आले. यानंतर निर्गुण आरती झाली आणि प्रसाद वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास उपस्थित सर्व श्रोत्यांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने व भावपूर्ण असे स्वामीजींचे दर्शनही घेतले. स्वामीजी देखील प्रत्येकाशी तितक्या आस्थेने, प्रेमपूर्वक संवाद साधत होते. प. पूज्य स्वामीजींच्या सोबत केलेल्या संवादातून मिळणारा आनंद आणि समाधान प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर जणू ओसंडून वाहत होते.

नाथसिद्ध गुरुपौर्णिमा उत्सवाच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा पावगी यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

अशा प्रकारे, श्री गुरुतत्वाच्या आशीर्वादाने तसेच प.पूज्य स्वामी स्वरूप स्वानंदजी यांच्या मार्गदर्शनाने, गुरुपौर्णिमेचा... अतिशय भारावलेला, मंत्रमुग्ध करणारा, आपल्याला आपल्या आत्मिक जाणिवेकडे प्रवास करण्यासाठी प्रेरणा देणारा, हृदयस्पर्शी असा कार्यक्रम संपन्न झाला!!!

श्रीसद्गुरुंच्या चरणी कृतज्ञता व समर्पण व्यक्त करण्यासाठी असणारा हा उत्सव संपन्न करण्यासाठी, दिव्योन्मेष सत्संगाच्या सर्वच साधकांनी आनंदाने, उत्साहाने आणि सेवावृत्तीने परिश्रम घेतले.

|| सो s हम् ||

|| हरी ओम तत्सत् ||

वृत्तांकन:

सौ. साक्षी सतीश बादरायणी,

(दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)