पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज मधून १९७८-७९ साली बी. ई. (मेटलर्जी) ही पदवी प्राप्त. प्रथितयश कंपन्यांमधून नोकरी करून वयाच्या तिसाव्या वर्षी पुणे येथे स्वतःचा व्यवसाय करीत असतांना व्यवसाय वृद्धी व व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा विकास साधला.
डॉ. पांडे यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक (विभाग प्रमुख) म्हणून आठ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले. याच काळात आन्तरप्रिन्यूअरशिप या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली. लहानपणापासून संत साहित्याच्या अभ्यासाची व साधनेची आवड, त्याचबरोबर उत्तम भाषाशैली व वक्तृत्व प्राप्त.
डॉ.सुधीर पांडे यांच्या आध्यात्मिक व्यासंगातून तथा प. पू. स्वामी स्वरूपानंद, पावस यांच्या अनुग्रहातून त्यांच्या आध्यात्मिक साधनेला बळकटी आली. तसेच प. पू. स्वामी विद्यानंद हे वडील असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आध्यात्मिक झालर प्राप्त झाली. गुरुकृपेतून पल्लवीत झालेल्या त्यांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाला, मनन चिंतनाची आवड थेट निदिध्यासापर्यंत घेऊन गेली. अनुताप, निश्चय तथा आत्मशोधाच्या शक्तीच्या जाणिवेतून त्यांचे भावविश्व आकार घेत गेले. यातूनच साकार झालेले आत्मविचार ग्रंथ रूपात आणले गेले. व्यावहारिक जीवन आणि अध्यात्म यांची जवळीक साधली गेली.
आध्यात्मिक जीवन One who chooses the God is already chosen by the God – ही इंग्रजी म्हण गुरुकृपांकीत डॉ. सुधीर पांडे यांना तंतोतंत लागू पडते. त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतींना तथा समग्र व्यक्तिमत्वाला तसेच “दिव्योन्मेष-सत्संग” या सामाजिक सत्संग उपक्रमाला सद्गुरुंचे कृपाछत्र कायम लाभले आहे.
आध्यात्मिक शिबिरे, सोहम साधनेचे ध्यान अभ्यास वर्ग तसेच सहज सुंदर प्रवचने म्हणजे आध्यात्मिक सिद्धाची ईश्वरी पूजा थेट त्या परब्रह्मा पर्यंत घेऊन जाते. आधुनिक विज्ञानाला अध्यात्म विज्ञानाच्या संपूटात घेण्याचा त्यांचा हातखंडा तरुण साधकाला विशेष भावणारा आहे. ही सर्व गुरुकृपाच नव्हे का!
२०२० च्या दिवाळीतील त्यांचा एक अनुभव.
” प्रकाशलेले हे मंदिर, देवतांच्या चेहेऱ्यावरचे हास्य आध्यात्मिक भाव प्रकट करतात असे वाटते. आपली कर्मभूमी हीच असावी असे वाटते. नियतीच्या उदरातील भविष्य वेध हाच आताचा तिचा संदेश असतो. साधकाने तो नक्की अभ्यासावा.
सद्गुरू माझे नित्य जागरूक | न सोडी मजला हे विशेष |
आम्ही काय करावे न करावे | सांगे मजला करुनी निःशेष ||
त्याच जाणीवे साधन आता | जाणुनी, स्पंद नव्हे तो संदेश |
मीच तुझ्या कर्तुत्वे उभारी | तूच होऊनि तव आदेश ||”
स्वामी विद्यानंद यांनी तर डॉक्टरांना आध्यात्मिक कार्यास भरभरून आशिर्वाद व पुढील मार्गदर्शन केले आहे. आदिनाथांपासून चालत आलेल्या, ज्ञानेश्वर महाराज तथा स्वामी स्वरूपानंद यांनी क्रांत केलेल्या ” सोहम साधनेचा” अनुनय ते करतात.
शनिवार दि.१२ डिसेम्बर, २०२०, पहाटे डॉ. सुधीर पांडे ह्यांना ध्यानात आलेल्या अनुभूतीचा भावार्थ व काव्य खाली देत आहे .
ध्यानाच्या खोल अंतरंग स्थितीत सूक्ष्म व विशाल चिदाकाशात चित्ताच्या गहन, गंभीर जाणिवेत, सद्गुरू स्वामी स्वरूपानंद तथा स्वामी विद्यानन्द यांच्या सगुण जाणिवा आकृतीत होत्या. आत्मप्रभेच्या मंद प्रकाशात डोलणाऱ्या ज्ञानयुक्त स्वरूपाची ज्योत नील रंगात तेवत होती. चित्ताची शांत जाणिव व स्वरूप अनुभवत होती. सोहम भावाची ज्ञानयुक्त घनता सोहम-सिद्ध हनुमंताच्या ब्रह्म जाणिवेत रममाण होती. सद्गुरूंचा ज्ञानाविष्कार तथा कृपादृष्टी जणू त्यांना “स्वानंद-स्वरूप” या अभिमंत्रित नावाने खुणावत होती. सर्व मुग्ध आणि चिंब होते.
औटपिठीच्या गर्भगृही,
समाधिस्त तो असतो।
‘स्वरूप’- ‘विद्या’ एक प्रकाशे,
नील ज्योतीतून रमतो।।
मन्दप्रकाशी, मंदस्मिती,
चित्त हृदि तो स्थिर।
प्रज्ञान जाणिवे विज्ञानातूनी,
क्षेत्रज्ञ प्रभावी तो थोर।।
समत्व चित्ति एकचि धर्मी,
सदा शांत अतिसूक्ष्म।
अति सूक्ष्म तो, अति विशाली,
सोहमभावे घनव्याकूळ।।
सद्गुरू माझे, ‘स्वरूप’ भावे,
ज्ञानजाणिवे ‘विद्येत’ रमावे।
ब्रह्म स्वरूपा सोहम जाणे,
“स्वानंद-स्वरूपे” मीच डुबावे।।
आज शनिचरी, सोहम सिद्धे,
सद्गुरूच ते हाकारी।
मात्र जाणिवे शुभ-प्रभाती,
“स्वरूप-स्वानंदे” डोलवी।।
ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन सोहळ्याचा अनाहत स्वर गुंजत होता ! सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी या आत्मनुभूतीतून त्यांना गुरूपदावर बसविले व “आदेश” दिला.
आध्यात्मिक अनुभूतीचे दर्शन त्यांना दृष्टांत रूपात सद्गुरू स्वामी स्वरूपानंद तथा स्वामी विद्यानंद तसेच गजानन महाराज शेगाव व शंकर महाराज यांनी दिले.
पंढरपूरचा एक प्रसंग नमूद करावासा वाटतो.
सद्गुरू स्वामींची कृपा किती असते बघा.
दि. १९ ऑगस्ट २०२२ कालाष्टमीला बारा तेरा साधक भक्तांना घेऊन स्वामीजी पंढरपूरला गेले होते. आदेश गुरुदेव व इतर ग्रन्थ पांडुरंगाच्या पायाशी समर्पण करावयाचे होते. सकाळी ७ वाजता मंदिराच्या नियमांप्रमाणे दर्शन रांगेत उभे होतो. पांडुरंगाचा गाभारा जस जसा जवळ येत गेला तस तसे त्यांची भाव जागृती होत गेली. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पायाशी मिठी घडली. सर्व अघटित समर्पण झाले. स्वामीजी भावविभोर अवस्थेत पांडुरंगमय झाले होते. सर्वच तटस्थ, अगदी गाभाऱ्यातील भक्त, गुरुजी सर्वच मुग्ध. मुकुटावरील मोगऱ्याचा गजरा थेट त्यांच्या ओंजळीत आला. तेच भाव काव्यात उमटले.
करतळी आला आला, तूच पांडुरंग,
नाहीं भक्ती माझी इतुकी, अश्रूना न रंग ||
दिव्य होऊनि तो आला, पदस्पर्शी मी दंग,
मुकुटा मधुनी ओघळला, फूल होऊनि अभंग ||
चैतन्याच्या अरुपी माझा, मला नसे थांग,
सगुणाच्या त्या मोगऱ्या मधुनी हसे पांडुरंग||
कटी करी नसे हो त्याच्या, भक्तासी तो दु-भंग,
जाऊन भेटू त्यासी आता, हृदयी वसे अव्यंग ||
आपले
दिव्योन्मेष सत्संग