Years |
---|
२०२४ |
२०२३ |
२०२२ |
आपल्या मधील अज्ञाना मुळे, अर्धवट ज्ञाना मुळे, माहिती मुळे आपल्या जीवनात व्यावहारिक, तथा पारमार्थिक चुका घडत असतात. आपल्या मध्ये अहंकार जर घट्ट असेल तर विकृत मन त्या चूका अव्हेरते.
आपल्या हातून सहसा काही चुकत नाही अशी मानसिकता असते त्या मुळे पुढचा विकास खोळंबतो. साधकाला साधनेत दक्ष राहून झालेल्या चुकांचे दुःख होणे अपेक्षित असते.
मनाच्या सूक्ष्म, अस्थिर अशा विविध स्तरांवर सतत आसक्तींची घालमेल होत असते. यम-नियम माहित असतात तरीही वृतींची ओढाताण त्यांची एकाग्रता भंग करतात. चित्त समत्वाच्या जाणिवेत येत नाही. ईश्वर अजूनच दूर जातो.
भक्ती-प्रेमाच्या माध्यमातून ईश्वराला आळवावे. आपल्या सगुण ईश्वरा समोर अश्रू ढाळावेत. हे भक्तीचे रुदन चित्त शब्द्धी करते.
हाच अनुताप, ईश्वर प्राप्तीसाठी.
अनुदिनी अनुतापे तापलो राम राया - रामदास स्वामी.
हा अनुताप साधकाला साधनेच्या विविध टप्प्यांवर साथ देत असतो.
आपल्या मानसिकतेचे आत्मनिवेदन सतत त्या ईश्वरा कडे करावेच लागते. साधनेचा तो अविभाज्य भाग असतो.
अश्रूंच्या त्या तप्त कणातून,
चित्त शुद्ध ते होतच गेले ।
आत्मप्रभेच्या प्रकाशातून,
जीवन तेही फुलतच गेले ॥
अनुतापाचा आधार साधनी,
भाव विभोरता मम त्या जीवनी ।
राम होऊनि कृष्ण जाणुनी,
आत्मप्रभेतच सर्व डोलवी ॥
‘अनुताप' हे साधक जीवनातील महत्त्वाचे प्रथम सूत्र आहे - मानव जीवन का? व कशासाठी याचा तो वैचारीक परिपाक आहे.
आत्मप्रवासी,
स्वामी स्वरूप स्वानंद.
अनुतापाच्या शुद्धतेतून चित्त हे भावविभोर होते. मन व बुद्धी सूक्ष्म अशा चिंतन, मननाच्या परिघात येत जाते. आध्यात्मिक भूमिका विचारांच्या प्रांगणात स्फुर्त रूप घेतात.
आपल्या जीवनाचा आधार, तसेच आपण नक्की कोण, आपली ओळख काय अशा अस्पष्ट अंधुक वलयांच्या आवर्तनात चित्त चिंतन करत राहते. यातूनच स्वरूप शोधाची तसेच आपल्या भोवतीच्या विश्व प्रांगणाची जिज्ञासा निर्माण होते. या जिज्ञासा पूर्तीचा निश्चय सुरू होतो. श्रवण, मनन, सत्संग यांच्या द्वारे निश्चयात्मक ध्येय चित्तात दृढ होत जाते.
'Who am I'? हा प्रश्न तसेच हे विश्व व त्याचे नेमके स्वरूप या बद्दल च्या शोधाची दृढता, हा जीवनाचा, जीवन जगण्याचा अविभाज्य भाग होतो. सर्व विकल्प दूर सारले जाऊन एकच निश्चयात्मक संकल्प तयार होतो. ही साधकाची मानसिकता असते. बाह्य जीवन प्रारब्ध भूमिका निभावत तो जगत असतो. हि प्रारब्धाला सामोरे जाणारी मन-बुद्धीची स्थिती चित्तातील दृढ निश्चय बळकट करत जाते.
आत्मप्राप्ती साठी कठीण, घट्ट, दृढ निश्चयाची नितांत गरज असते.
आपल्या जीवनातील विविध बाह्य तथा आतून वृत्तीतून तयार होणारी
आकर्षणे, ओढ, आसक्ती यांना दूर सारणे ही काही सोपी गोष्ट नव्हे हे साधकाने ध्यानात धरणे गरजेचे असते. इथे आपले पृथ्वीवर प्राप्त झालेले सदगुरुही उपयोगी पडत नाहीत.
या करिता सदगुरुंचे स्थान आपल्या हृदयात, आत्मस्थितीत शोधावे लागते.
'मज हृदयी सदगुरू, जेणे तारीलो हा संसारपुरू ।
म्हणोनि विशेष अत्यादरु, विवेकावरी ॥'
आपला आपल्यावरील आतून असणारा अंकुश महत्त्वाचा असतो. या साठी निश्चय लागणार. हा निश्चय असेल, खात्री असेल तर सहजपणे विवेक तयार होतो व कुठली गोष्ट टाळायची, नाकारायची (rejection) हे उमजते.
'निश्चयाची' गरज साधकाला अत्यंत असते, कारण ध्येयाची म्हणजेच आपल्या मधील ईश्वराची अनुभूती नसताना या मार्गावर चालावे लागते. आड येणाऱ्या क्षणांना, घटनांना दूर सारणे अथवा त्यातून आध्यात्मिक जीवन साधने ही साधना म्हणजे तारेवरची कसरत असते. या साठीच श्रवण, मनन, चिंतन हा आत्मसाधन मार्ग निश्चयाने चालावा लागतो.
या कारणे निश्चय हे प्रमुख दुसरे सूत्र होय. यातूनच पुढे बीज रुपात असणारे तिसरे सूत्र आकारास येते. अनुताप व निश्चय यांच्या रोजच्या आधाराने वाढणारे तिसरे सूत्र म्हणजे ‘आत्मशोधाची शक्ती !'
आत्मप्रवासी,
स्वामी स्वरूप स्वानंद.
अनुताप व निश्चय या दोन सूत्रांचे चिंतन आपण केले. साधक जीवनाला
योग्य मार्गावर ठेवण्या साठी या सूत्रांचा म्हणजे आपल्या मधील जाणीव शक्तींचा साधकाला सतत उपयोग करावा लागतो. मन-बुद्धी ला सत्संग, श्रवण, मनन, चिंतन यात ठेवावे लागते.
आपल्या मध्ये उत्कंठा, जिज्ञासा या शोध वृत्ती असतात. बुद्धीने ईश्वरा
विषयी ज्ञान घ्यावे. या साठी या वृतींचा उपयोग करावा. ज्ञान थेट परब्रह्माचे द्वैत-अद्वैत जाणिवेतील प्रज्ञान मय स्वरूप पर्यंत घ्यावे. यातूनच खरा निदिध्यास सुरू होतो तो ही ज्ञानमय जाणिवेतून. श्रवण, मनन, चिंतन हा आत्मज्ञानाचा साधन मार्ग म्हणतात त्याचे हेच कारण आहे. ईश्वरा बद्दलचे ज्ञान व यातूनच ईश्वर शोधाची वृत्ती निर्माण होते. हीच आत्म शोधाची शक्ती होय.
साधकाला ह्या शक्तीचा शोध त्याच्या आत मध्ये लावावा लागतो. ईश्वर
प्राप्तीची खरी तळमळ हेच या शक्तीचे भक्तीत परावर्तित होणारे स्वरूप आहे. या आत्म शोधाच्या शक्ती आधारेच आत्मा, विश्वात्मा तथा विश्वातीत स्वरूप होण्याचा, आत्मपूर्णत्वाचा योग मार्ग आहे.
कर्म, ज्ञान व भक्ती च्या एकत्रित ब्रहा जाणिवा साधकाची
होतात. हाच पूर्णयोग.
यासाठी या त्रिसूत्रींची उकल साधक जीवनात करून घ्यावी लागते.
अनुताप, विश्वय, आत्मशोधाची शक्ती.
त्रिसूत्रांच्या आधारातून,
साधक जीवन जगतच जावे ।
अनुतापाच्या अश्रूमधुनी,
चित्त शुद्ध ते सदा असावे ।।
'सदगुरु' म्हणजे सामान्य माणसांना अत्यंत निरपेक्षतेने भगवंतांच्या मार्गात सहाय्य करणारा 'आत्मज्ञानी पुरुष' होय. असा प्रत्येक पुरुष सदगुरूच समजावा. - संत एकनाथ
श्रवण-मननी, एकाग्र होऊनि,
सत्संगी ते निश्चयी व्हावे ।
ध्येय जाणीवे, ज्ञान घेऊनि,
प्रज्ञान जाणीवे स्थिरता यावे ।।
अनुतापे, त्या निश्चयी राहून,
साधनेतून विज्ञानी व्हावे ।
हृदयीगुरू तो कृपे मधून,
आत्मशक्तीत्वे सादर असे ।।
अनुताप, निश्चय व आत्मशोधाची शक्ती ही दिव्योन्मेष सत्संगातील साधक जीवनातील त्रिसूत्री आहे.
सद्गुरुंच्या सान्निध्यातून, अनुग्रहातून, माणसाने, साधकाने काय शिकावे, काय आत्मसात करावे...? हा विषय खरोखर चिंतनीय आहे.
अर्जुनाला भगवान श्री कृष्ण जेंव्हा ज्ञान देत गेले त्यावेळेस त्यांच्या मनातील विचार व साधकाने आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत करावयाचे चिंतन सारखेच असेल.
आपले सद्गुरु मानवी स्वरूपात आपल्या सारखेच आहेत, आपल्या सारखेच जीवन जगतात, खाणे, रहाणे, झोपणे, बोलणे, हसणे सर्व आपल्या सारखेच...! सामान्य व्यवहारातही ते लक्ष घालतात व आपल्या सारखेच ते ही आजारी पडतात....ते ही मर्त्य मानव...,पण त्यांच्या आत महान, दिव्य वस्तू आहे. त्यांनी त्यांच्या देहाचे मंदिर केले व आत ईश्वर स्थापन केला. ते दिव्य तत्व मला दिसत नाही. माणूस व त्याचा वंश मी, माझ्या अस्तित्वाचे गूढ या महान गुरूच्या अंतरंगातच झाकलेले आहे. मी ते जाणून घेणे गरजेचे.
मानव रूपातील सद्गुरु हे त्यांच्या सर्व नातेवाईक, संबंधित परिवार, मित्र यांच्याशी मानवतेच्या ही पुढच्या, प्रत्येक आत्म्याशी जिव्हाळा राखून असतात. त्यांच्याशी संबंध राखू इच्छिणाऱ्या बद्ध, मुमुक्षू माणसांनाही तेवढ्याच ईश्वरी प्रेमाचा अनुभव देतात. प्रत्येकात ईश्वर आहे हे ते कृतीने दाखवतात.त्यांचा आत्मा आपल्या आत्म्याला आधार देतो, आणि त्यांच्याशी आपले ऐक्य कसे होईल ....,अशी साधना, ज्ञान ते आपणास देतात.
आपली पण सर्व नाती, परिसर ईश्वराच्या जाणिवेतून कसे बघावे हे ते सांगतात. भागवत भक्तीचे हे बिजच नव्हे का?
सद्गुरूंच्या या वैश्विक प्रेम जाणिवेतून आपल्यालाही उत्साह येतो. आपल्याला एक सामर्थ्य प्राप्त होते. जीवन जगण्याचे, साधना करण्याचे उत्तेजन मिळते.
सद्गुरुं मधील दिव्य विष्णू स्वरूप अगदी जवळचे वाटू लागते, त्यांच्या कृपा सागरात आपले आध्यात्मिक जीवन सफल होते.
सद्गुरूंचे हे स्वरूप साधकाला धीर देणारे, आधार म्हणून उपयोगी पडणारे असे असते. या स्वरूपाची आराधना नेहमी करावी. हे स्वरूप साधकाला आत्मज्ञानाच्या जाणिवेत नेते, अंतरात्म्याला आध्यात्मिक आनंद देते.
आत्मप्रवासी,
स्वामी स्वरूप स्वानंद.
*हनुमंत* *व त्यांचे व्यक्तिमत्त्व* स्वरूप, कार्य स्वरूप, साधन स्वरूप समजणे खूप गरजेचे आहे.
सत्संगा मधून मी हे बरेचदा विषद करत असतो. आपल्या सर्वांचे ते आराध्य दैवत आहे, असो.
नवग्रह जे या संपूर्ण ब्रह्मांण्ड निर्मितीच्या, उत्पत्ती-स्थिती-लय या कार्याचे अधिकारी आहेत. त्यात शनी महाराजांचे कार्य माणसाला जास्त परिचित असते ,परंतु या नवग्रहाचे स्वामी म्हणून जाणले जातात ते *हनुमंत* ...! त्यामुळे साहजिकच शनिदेव यांची उपासना केल्याने हनुमंत प्रसन्न होतातच , परंतु हनुमंताची उपासना ही नवग्रहांना प्रसन्न करते. हनुमंत उपासनेचे अनेक आध्यात्मिक फायदे आहेत. ब्रह्मांण्ड स्वरूप आकलन, भक्ती, कर्म व ज्ञान या तिन्ही जाणिवांचा एकत्रित पूर्णयोग हनुमंताच्या व्यक्तिमत्त्वातून अनुभवता येतो , किंबहुना प्रलय काळात हेच हनुमंत ह्या सर्व देव देवतांना आपल्या लपेटीत सामावून घेतात व आकाश मार्गे मूळ आदिबीज श्रीरामांमध्ये विलय पावतात.
हनुमंताच्या साधने बद्दल...,ते रामभक्त आहेत, व महाशून्य अवस्थेत ते कायम बुडालेले असतात. म्हणजेच अतिमानसीक अवस्थेत ते परब्रह्मस्वरूपात चिरंजीव असतात त्यांचा कार्य विस्तार हा अबोध मनाच्या जाणिवेतील निःशुन्या अवस्थेत असतो,ज्या प्रमाणे भगवान श्रीकृष्ण होते..., अतिमानसीक विज्ञानमय पुरुष.
आता ह्यातून त्यांच्या साधनेचे स्वरूप समजून घ्यावे.
आत्मप्रवासी,
स्वामी स्वरूप स्वानंद.
सद्गुरु स्वामी स्वरूपानंद असे म्हणतात -- ' ती विद्या मिळवू इथे.'
साधकाने नेमके पणाने प्राथमिक हे समजणे गरजेचे आहे कि प्रपंच करायचा का परमार्थ? यातला भेद समजून घेता यायला पाहिजे. हे समजून घेणे याला आपण आधुनिक शाळा पद्धतीतील प्ले ग्रुप म्हणू.
आपल्या असं लक्षात येतं की माणूस या प्ले ग्रुप मधेच वर्षानुवर्षे काढत बसतो. व अज्ञान इतके घोर असते कि त्यालाच तो उच्च विद्या विभूषित समजतो. आपल्या स्वतःच्या कल्पनेनेच सर्व ठरवतो व जीवन स्वतःच्या सोयीने जगतो. आत्म्याच्या जाणिवां पर्यंत तो येतच नाही.
स्वामींना जी विद्या मिळवणे अभिप्रेत आहे ती अध्यात्म विद्या. या साठी ज्या मार्गाने आपण जावयाचे ठरवले असेल त्याचे नेमके ज्ञान आवश्यक नाही का? कुठले नियम, शिस्त, आचरण अमलात आणायचे हे महत्वाचे आहेच ना. किती काळ आपण असेच राहणार, त्याच इयत्तेत ?
आपण शाळा, कॉलेज मधील सर्व नियम पाळतोच ना.
ऊन-पाऊस, सण-वार, नाती-गोती, लग्न-मुंजी या गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागल्याचं ना. ध्येय ठेवावे लागेल.
ठरावीक सुट्टी सम्पली कि मूळ पदावर यावे लागलेच. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा लागलाच ना.
इथे तर अभ्यास व ध्येय इतके मोठे आहे की सुट्टी ला परवानगीच नाही. आपली ईश्वराप्रति म्हणजे आपण जे जीवन आखले आहे ज्यात सत्संग, श्रवण, मनन, चिंतन, जप, पूजा, लेखन, ध्यान हा रोजचा गृहपाठ होणे गरजेचे आहे.
स्वयंशिस्त हाच मानदंड. कारणं अनेक आहेत. कारणात जो अडकला तो अयोग्य, अशीच या शाळेतील पद्धत.
इथला शिक्षक आपणच व्हावे लागते, परीक्षा आपल्यालाच द्यावी लागते व आपले अवलोकन निर्भीड पणे आपल्यालाच करावे लागते! पास किंवा नापास रिझल्ट शेवटच्या दिवशी, टर्म सम्पते त्या वेळी कळतो. मृत्यू च्या दिनी!
नापास झालो कि दुःख करायलाही मिळत नाही.
अगोदरच प्रकृतीचे नियम समजून घेणे हा शहाणपणा.
या तीनही जाणिवा एकत्रित प्रत्येक माणसात असतातच. त्याचा व्यक्ती सापेक्ष योग्य उपयोग साधकाने करणे, हाच पूर्ण योग समजावा.,
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
कर्म मार्ग हा सुद्धा शेवटी सर्वस्व समर्पण स्वरूप पूजे सारख्या अनन्य भक्तीच्या धारणेतून तयार होतो.
त्या परब्रह्माला आपल्या सर्व इच्छा व त्यांचे कर्म स्वरूप होणारे व्यापार, यज्ञ केल्यासारखे अर्पण करावे. ही आंतरीक जाणीव साधकाला ठेवावी लागते. मन व बुद्धीचे सर्व क्रिया स्वरूप त्या ईश्वराच्या जाणीवेतून होणे अगत्याचे. आपल्या मध्ये व्यापार करणाऱ्या सर्व शक्ती ईश्वराच्या होत. हा एक स्वरुप यज्ञच आहे.
शाश्वत परमपुरुषाला ओंकार स्वरूपातील जाणीवेतून त्याचे त्याच्याही पलीकडचे अनंत-तत्व ओळखून त्याचे पूजन स्वरूप आपली कर्मे , आपल्या समर्पणाचा भाग असावा. आपला भाव असा असावा की तो आपले लाड करतो आहे, पोसत आहे. त्याने हे सर्व विश्व प्रसवले आहे, या नात्याने तो आपली आई आहे. ती आपल्याला जवळ घेत आहे. सर्व नामरूपात्मक अस्तित्व, रचना या आपल्या उपयोगा साठी आहेत, ते त्याचे प्रेम समजावे.
खरंतर परब्रह्म हे या जीवनाच्या प्रवासाचे प्राप्त करण्याचे ध्येय आहे. व तोच, तो स्वतःच प्रवासाचा मार्ग नव्हे का?
म्हणून साधकाने जीवनाचा उद्देश समजून घ्यावा. सर्वश्रेष्ठ ध्येय 'परब्रह्म प्राप्ती' यासाठी जे ज्ञान मिळवणे, या साठी जो व्यापार करणे, तसेच यासाठी जी जीवाची तगमग होणे ज्याला आपण भक्ती म्हणतो ते सर्व कर्मच असते.
अशा साधकाचा योग-क्षेम तो पहातो असे वचन दिले आहे. मग भय कुठले? ह्यालाच हल्लीच्या भाषेत "मी तुझ्या पाठीशी आहे!!" हे वचन. पण त्या साठी कर्मयोगाची ही जाण महत्वाची नाही का!,
योगी अरविंद म्हणतात- सर्वोत्तम ज्ञान, सर्वोत्तम भक्ती, पूर्ण आत्मसमर्पण त्या पुरुषोत्तमच्या चरणी करणे हाच एक त्या पुरषोत्तमाला प्राप्त करून घेण्याचा मार्ग आहे. हा मार्ग म्हणजे कर्म योगच नाही का?
डॉ सुधीर पांडे
दिव्योन्मेष सत्संग
आपण कसेही असो... ज्ञान व अज्ञान यांच्या सरमिसळ भूमिकेत असतो. ही ज्ञान व अज्ञान भूमिका सर्वसामान्यपणे प्रमाणातील फरक पाहता, विशेषतः आध्यात्मिक दृष्टिकोनातून, अज्ञानीच जास्त असते. हरकत नाही...तरी पण आपल्या आध्यात्मिक हृदयात प्रेम ही जाणीव असतेच, नाही का! अज्ञान हे जडातून येते. पुढे अन्नमय, प्राणमय अवस्थेत शिरते. हा प्राण मूलतः जडातूनच पृष्ठावर आला आहे. तो जरूर अज्ञानी आहे..... परंतु, गुप्त चैतन्याच्या स्पर्शातून वरती येत आहे. त्यामुळे मनोमय माणूस हाही त्या प्रेमावर स्वार आहे.
आपल्याला त्यामुळे संपर्कातील व्यक्ती, वस्तू, अगदी जडत्वावर पण सहज उत्कट प्रेम असते.
आपल्यातील अज्ञान आपल्या हृदयाला बंदिस्त करते हे खरे, परंतु मूर्तीचीही पूजा करावयास आवडते.
ही पूजा जेवढी प्रेमाने होईल, तेवढे आपल्याच लक्षात येते की, आपल्या भावनिक तथा मनाच्या जाणीवा क्रांत करण्याची ताकद.... त्या मूर्तीत, प्रतिमेत आहे. पूजेपेक्षाही अजून श्रेष्ठ असे तत्व, त्या मूर्तीत आपण पाहू शकतो.
आपल्या जाणिवेतील पुरूषोत्तम आपण मूर्तीत साकारतो. मूर्तीतून आकारापलीकडील निरंजनही बघण्याचा प्रयत्न करतो. यातूनच आपली ज्ञान-विज्ञान अनुभूती वाढत जाते नाही का! आपल्यातला ईश्वर, माणसातील ईश्वर, पशु , पक्षी.....सर्व वेगळ्या विशालतेत.....काही काळ का होईना, आपण पोहचतो. अगदी आपण अज्ञानी जरी असलो तरी व्यक्तीसापेक्ष प्रेमही, कुठेतरी त्या ईश्वराची गूढ मूर्ती आपण शोधत असतो!
याकरिता हे व्यक्तीप्रेमही उच्च ज्ञानाच्या भूमिकेतून विशाल झाले तर, आत्मशोधच ठरते !
यातूनच पुढे विश्वप्रेमाची गोष्ट घडते...
व्यापकत्व हा प्रेमाचा स्थायी भाव असावा !!
यातूनच पुढे त्याग, सदिच्छा, कल्याण, मानवता ह्याचा शिरकाव होतो.
आत्मप्रवासी.
स्वामी स्वरूप स्वानंद
"कर्म", या संदर्भात साधकजीवनात नेहमी घालमेल सुरू असते. त्याला आपल्या रोजच्या कर्मात, ' चूक की बरोबर ' हा प्रश्न सतावत असतो. कर्माच्या विविध प्रकारातून तो नेमकं कसं वागावं, या गोंधळात असतोच असतो. त्याला कळत असतो आपला स्वार्थ, आपल्या इच्छा, वासना, अपेक्षा व यातूनच तो आपली साधना म्हणजेच ईश्वराची पूजा बांधण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या स्व-कर्मावरचाच विश्वास हरवल्यासारखा होतो. कर्म-अकर्म यांच्या क्षेत्रात विद्वान पंडितही गोंधळतात.
कृष्ण भगवान म्हणतात, कर्मानेच ज्ञान व मुक्ती मिळते. मग हे कर्म कुठले व कसे करायचे?
यावर भगवान काय म्हणतात - माणसाने बाहेरील प्राप्त कर्माच्या मध्ये, हे कर्म योग्य हे, अयोग्य असा भेदाभेद करू नये. त्याची गरजही नाही. आपल्याभोवती आवश्यक असणारे कुठलेही कर्म टाळणे, अथवा टाकणे अशी वृत्ती नसावी.
सर्व कर्मे माणसांनी करावी. साधकाने काळजी मात्र इतकीच घ्यावी की, त्याने आपल्या आत्मजाणिवा ईश्वराशी जोडाव्यात. योगाने मन व बुद्धी त्याला समर्पित असावी.
अर्थात, ही स्थिती एकदम येणे अशक्य आहे. परंतु, ही कला प्राप्त होणे, म्हणजेच कर्म कुशलता होय. तसेच ह्यातूनच ' आत्म्याचे ज्ञान ' प्राप्त होते. यासाठी उच्चतम, अग्रबुद्धीची गरज असते. श्रेष्ठ मनाची ही ज्ञानयुक्त जाणीव असते.
अकर्म, इच्छा- अपेक्षेतून घडणारे कर्म हे कर्मच असते.... ते कधी थांबू पण शकत नाही. आपले मन या भ्रमात असते की, कर्म मनच करते. परंतु, इच्छा, वासना स्वार्थ या गोष्टी सर्व आपल्या प्रकृतीच्या अधीन असतात... हे कळणे गरजेचे. आपण त्या प्रकृतीत लुडबुड करू नये.
इथेच सर्व आपला गोंधळ असतो. बाहेरील ईश्वरनिर्मित प्रकृतीत जर बारकाईने बघितले तर लक्षात येते की, तेथे देखील प्रकृतीच काम करत असते. तिथे तिचीच सत्ता सुरू असते.
उलट, कर्म अधिक जोमात सुरू असते. आत्मा मात्र प्रकृतीच्या कर्मापासून लांब असतो...अलिप्त असतो, कर्ता नसतो.
आत्म्याची ही बैठक साधकाला जमणे आवश्यक. असा जीव हा प्रकृतीच्या गुणांच्या दास्यात अडकत नाही.
जो कर्माच्या ठिकाणी अकर्म आणि अकर्म अवस्थेत कर्म चालू असलेले जो पाहू शकतो, तो खरा श्रेष्ठ मनाचा, विवेकी माणूस समजावा.
आत्मप्रवासी.
स्वामी स्वरूप स्वानंद
सत व सत्य यातला नेमका फरक काय? सत चित आनंद हे त्या विश्वातीताचे निरंजन स्वरूप. मग सत्य हे वेगळे का? सत्य बदलते, पण सत हे निरंजन, अव्यय, कालातीत सदैव परे बरोबर असते. परा व पुरुषोत्तम (म्हणजे मूळ सत) हे अभिन्न असतात. सत्य मात्र प्रत्येक प्रदेशात(अवस्थेत), वेगळे रूप घेणारे, अपूर्णाला पूर्णत्वा कडे नेणारे, कधी तेच अपूर्ण होते व पुढचे पूर्णत्व दाखवते. अधोमुख असते ते ऊर्ध्वमुख होते. अधो मानसिकतेतून अधिमानसात येते व पुढे प्रकाशाच्या वाटेने स्फूर्त रूप घेत अबोध होते. आता खरी सत्याची वाटचाल सत कडे सुरु होते. अतिमानसिक विज्ञानातून मूळ सत आतापर्यंतच्या सत्याला आपल्या सम्पुटात घेऊन आपले सत चे दिव्य दर्शन प्रकट करते तेच सत्य, शिव व सुंदर असते.
चैत्राच्या निरभ्र आकाशात तेजाचा अग्नी व वायूची गती वाढत जाते व याच प्रक्रियेतून जलधारा आषाढात कोसळतात. तप्त झालेल्या भूमिला रिझवत त्याच पृथ्वीतून नवनवोन्मेषीत बीजे अंकुरतात. लवलवत्या पानांमधून कणसे धरू लागतात. कोवळ्या सूर्य किरणातून श्रावण डोकावू लागातो, शिवाचे शिवत्त्व विष्णूच्या नवनिर्मितीच्या अविष्काराने आनंदी होते , डोलू लागते. जिवाच्या भौतिक समृध्दीला उधाण येते. या निर्मितीचा हेतू मात्र त्याला कळत नाही. त्यात माणूस, त्याला सर्व स्वतःचीच काळजी, हे सर्व त्याच्या साठीच आहे व नित्याचे असल्याने हा निसर्ग त्याला नेहमीचा होतो, आश्चर्य बोथट होते. अज्ञान वाढत जाते, श्रावण तो पाळतो, सोमवार तो करतो परन्तु अज्ञान निवृत्ती होत नाही. निसर्गातील बदल का, कसे, कशा साठी, कोण करते ह्याचा शोध होत नाही. अमावस्या येते, अज्ञान साजरे होते. ज्ञानाची पहाट फार मोठ्या अपेक्षेने उगवते, भाद्रपद सुरु होतो. “गणपतीची” लगबग सूर होते, भौतिकात, अडकलेला जीव स्वतःच्या मनाप्रमाणेच ठरवतो. गणपतीचं स्वरूप समजून घेतच नाही. आरत्या, अथर्वशीर्ष, दुर्वा, हार, फुले,आरास, प्रसाद, मनोरंजन, गाणी, आपलीच हौस मौज, वैयक्तिक तथा सामूहिक जीवनात नुसता गोंधळ. अज्ञान गेलंच नाही….
विद्येची, ज्ञानाची देवता. देवा तूचि गणेशु. मानवी जीवनात या दिवसांचे महत्व वैयक्तिक दृष्ट्या खूप आहे. जेंव्हा सार्वजनिक पद्धत नव्हती त्या काळात प्रत्येक घरा मधून गणपतीची ज्ञानयुक्त जाणिवेतून स्थापना होत असे. गणेशाचे स्वरूप जाणून घेऊन आपले स्वतःचे स्वरूप जाणणे महत्वाचे असते. स्वतःची ओळख काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हे जीवन आहे. या जीवनाला सांभाळण्यासाठी संपूर्ण निसर्ग तत्पर आहे. नियमित आहे. माणूसच अनियमित, दुराचारी आहे, अहंकारी आहे. अज्ञानी आहे. याचा परिणाम म्हणून अनंत चतुर्दशी नंतर जिवात्म्याच्या विश्वाची जाणीव मानवाला नियती करून देत नसेल ना?….
आत्मज्ञानानंतरची जी साधना, म्हणजे स्व-ची ओळख जेंव्हा होते व पुढचा साधक-प्रवास व त्याचे स्वरूप,हे योगी श्री अरविंद यांनी “सिन्थेसिस ऑफ् योगा” मध्ये विस्तृत प्रमाणात वर्णन केले आहे. स्वतःची अनुभूती रोजच्या रोज लिहून ठेवली आहे.
मनुष्य जन्माचे हे खास वैशिष्ट्य आहे की, तो विकास क्रमात अग्रेसर आहे. त्याला शरीर, मन व बुद्धी यांची वाढीव स्वरूपे प्राप्त आहेत. विशेषें करून मन व बुद्धीच्या सूक्ष्म जाणिवांच्या प्रांतात तो विकास साधु शकतो. बुद्धीने आत्मशोधाची ध्येय वृत्ती वाढवून मन अधिक सूक्ष्म, बलवान व स्थिर करू शकतो. त्या मुळे आत्मज्ञान तथा विश्वरूपाच्या जाणीवेत तो स्वप्रयत्नाने विकसित होऊ शकतो. निसर्गाच्या अवघड कालगतीत होणाऱ्या विकास प्रक्रीयेवर मात करू शकतो. हजारो वर्षे वाट बघत बसण्याची गरज नाही. “याची देही याची डोळा, पाही सुखाचा सोहळा” ही संकल्पना साधक शक्यतेत आणु शकतो. या साठी अभ्यास व ध्यान याची नेमकी ओळख गरजेची आहे.
दिव्य जीवनाची, थोडक्यात जीवन जगण्याची कला म्हणजे, आत्म्याच्या जाणीवेत जगणे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात- “अहम आत्मा हे कधीची विसरो नये” अर्थात ही स्थिती येण्या साठी सोहम साधना हाच पर्याय सद्गुरु सांगत असतात.
प्रापंचिक जीवनात साधकाने ईश्वर चिंतन व त्याचे वैश्विक स्वरूप याचा अभ्यास करत असावा. हेच श्रवण मनन.
प्राथमिक प्रपंच परमार्थ मय करावा व नंतर परमार्थ करत करत आत्मज्ञान साधावे. या नंतर वैश्विक जाणीवेतून अधिमानसिकते मध्ये होणारा जीवन प्रवास हा ज्ञानयुक्त जाणीवेतून असतो व हेच दिव्य जीवन असे योगी अरविंद म्हणतात. येथे अतिमानसिक जाणीव ही साधकाला अधिमानसिकते मध्ये नेत जाते, विश्वस्वरुपाच्या सर्व जाणीवा त्याच्या अबोध मनाला सुखवतात. पुढचा टप्पा हा अतिमानसिक विश्वातीताच्या जाणिवेचा , अनंताचा. स्वामी स्वरूपानंद म्हणतात – स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले! स्वरूपा विश्वरूपा आगळे, नित्यतत्व!! तीच योगी अरविंदांची अनुभूती, रामदास स्वामी, हरिसंकल्पातून सूक्ष्मातून कार्य करणाऱ्या हिरण्यमयी कोषाच्या मधून व्यक्त होणारे ओंकार स्वरूप, गुण माया, तिचा होणारा पंचमहाभौतिक विस्तार – गुणक्षोभिणी माया, व पुढे निर्माण होणा-या चौऱ्यांशी लक्ष योनी , त्यात मानव. या मानवानी करावयाचा विकासाचा प्रवास व योगी अरविंदानी दाखविलेला दिव्य जीवन मार्ग हे अभ्यासल्यावर असे जाणवते कि संत हे सर्व एकच मार्ग दाखवतात जो उपनिषदांनी पण प्रस्तुत केला आहे.
ज्ञान, कर्म,व भक्ती हे तीन मार्ग ईश्वराकडे जाण्यासाठी आहेत हे वरपांगी पाहता बरोबर वाटते. परन्तु या पृथ्वीवरचा हा नियम आहे कि जेजे पूर्ण वाटत ते ते कुठेतरी अपूर्ण असतच असत. पूर्णत्वाकडे अपूर्ण गोष्टीतूनच, अज्ञानातून जावे लागते.
वरील तीन मार्ग म्हणून जे आपल्याला वाटतात त्यातल्या अपूर्णता काय आहेत. कर्मात चित्त शुद्धी होते पण कर्मी होण्याचा रजोगुणी दोष आहे.
वरील तीन मार्ग म्हणून जे आपल्याला वाटतात त्यातल्या अपूर्णता काय आहेत. कर्मात चित्त शुद्धी होते पण कर्मी होण्याचा रजोगुणी दोष आहे.
भक्तीत सगुण ईश्वराच्या उपासनेत त्याचे निर्गुणत्व भावत नाही, विशालता समजत नाही. ज्ञान मार्गात सगुण, निर्गुण सर्व समजत पण निष्काम कर्म, व सगुणातून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा उदय हे अहंकारा मुळे जरा शुष्क होऊ शकते.
या साठी या तीनही कर्म, भक्ती व ज्ञान यांचा विवेकाने वापर करता येणे महत्वाचे आहे. रामदास स्वामी दास बोधाच्या सुरवातीला म्हणतात- “येथे भक्ती योग हा विषद केला”. पुढे मात्र सर्व ज्ञान व कर्म यांचेच समास आहेत.
या तीनही जाणिवा एकत्रित प्रत्येक माणसात असतातच. त्याचा व्यक्ती सापेक्ष योग्य उपयोग साधकाने करणे, हाच पूर्ण योग समजावा.,
आपण सर्वजण लहानपणापासून पूजन, पूजा, वन्दन करत असतो. शांत व आनंदी मनस्थितीत पूजा केली कि विशेष समाधान आपणास प्राप्त होते. हा अनुभव बहुतेक सर्वाना आलेला असतो.
काहीजण मानस पूजाही करतात. पूजे मध्ये पूजा साहित्य तथा पूजा स्थान या पेक्षा माणसाची श्रद्धा हीच महत्वाची असते. श्रद्धे शिवाय ईश्वर कळत नाही हे खरेच आहे
“भाव बळे आकळे, एरवी नाकळे”
या सर्व पूजा साधकाला महत्वाच्या असतातच परन्तु संतांनी व शास्त्राने जी श्रेष्ठ पूजा सांगितली आहे ती आपण टाळतो. हि पूजा म्हणजे हृदयस्थ आत्म्याचे पूजन. ईश्वर आपल्या आत आत्मस्वरूपात स्थित आहे.
परमार्थात अखेर साधकाला प्रथम आपल्या अंतरंगात खोल बुडी मारून समाधिस्त असणारा आत्मा शोधावा लागतो. सर्व पूजा, सर्व साधनांचा शेवट येथेच होतो.
ज्यांना खरोखर आत्मज्ञान, ईश्वर हवा असेल त्यांनी हीच साधना करावी. सरळ हृदयात शिरावे. आपले ह्रदय हे देवघर आहे. त्या देवघरातील ईश्वर हा खरा आपला चालक आहे व तो पुढेही आपला चालक असतो. तोच आपला सद्गुरु असतो. तो आपल्याला सर्व ब्रह्माण्डचे ज्ञान देतो. स्वतःचे विश्वरूप दाखवतो व विश्वातीत रूपही दाखवतो.या आत्म्याचे पूजन करावे.
याला आपला अहंकार, देहबुद्धी अर्पण करावी. आपण जे आपल्या मुखात घेतो ते या देवाच्या मुखात घालत आहोत असे समजावे.
“मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता ।”
हि श्रेष्ठ आत्मपूजा असते.
योगाचा मार्ग काय किंवा समर्पणाचा मार्ग काय, दोनीही मार्गाच्या प्राथमिक गरजा दुर्लक्षित करून चालणार नाही. बद्ध अवस्थेत असलेल्या प्रापंचिक माणसाला सर्वच सुरवातीला अवघड असते असा अनुभव दिसतो. सद्गुरुं कडून अनुग्रह प्राप्त झाला कि माणसाला सुरवातीला कळतच नाही कि आपण नेमके काय साध्य करावयाचे आहे. मग हळू हळू तो परत प्रपंचात रस घेत जातो, प्रपंच व परमार्थ यांच्या चढा ओढीत बरेचदा परमार्थच हरतो.
वाचन, मनन, चिंतन हे अध्यात्मातील महत्वाचे अंग तो दुर्लक्षित करतो. ऐकीव तथा स्वतःच्या छोट्या बुद्धीला जे योग्य वाटेल तेच करत राहतो. ध्येय, विवेक याचा प्रखर विचार नसतो.
सद्गुरु, देव या सर्व गोष्टी पार्ट-टाईम अथवा थोडा टाईम पास असतो. स्वतःचे अवलोकन नसते त्या मुळे अभिलाषा, वासना-इच्छा यांचा संग(काया, वाचा, मने), वस्तूंचा संग्रह, तितिक्षा, आदी दोष स्वतःच्या अहंकारातच बसते करतो. अगदी सद्गुरु सहवास असला तरी ध्येय ठरविले जातेच असे नाही. आत्म शोधाची वाटचाल हे ध्येय नसते.
अशा अनेक त्रुटी घेऊन तो चालत असतो. त्या मुळे समर्पण तथा योग याच्या प्राथमिक मानसिकतेत येणे हि प्राथमिक गरज असते. योग म्हणजे आपल्या वृत्ती ईश्वराकडे लावणे, व समर्पण म्हणजे.. सर्व धर्माम परित्यज्य मामैकम शरणम व्रज।। हे सर्व खूप दूर राहते.
असो, याचा अर्थ नक्कीच असा नाही कि माणसाने निराश व्हावे. प्रथम बद्ध अवस्थेतून साधक होणे हि परमार्थाची पहिली पायरी आपल्या वैयक्तिक जीवनात साधने हे महत्वाचे असावे. तत्वज्ञानी संतांचे वाचन व आपल्या स्वतःचे जीवन याचा परामर्श महत्वाचा असतो, नाही का?
सम्पूर्ण विश्वातील अस्तित्व हे ईश्वरी जाणीव शक्तीतून निर्माण झाले. त्या निर्मिती मागे जे विशिष्ट स्वरूप असते ते आनंदाचे असते. हे विश्व आनंद निर्मिती साठी निर्माण झाले असे म्हणावे तर सर्वत्र दुःखही दिसते. शारीरिक व मानसिक दुःख. खरे तर मूळ सत- चित-आनंद सर्वत्र आहे. संतांचा तो अनुभव आहे. परन्तु मानवी मनोभूमिके मध्ये दुःख हे दिसते.
विश्व हे आनंदाचे घर न वाटता दुखाचेच घर वाटते. तसा अनुभव येतो. आपण आपल्या आयुष्याचा जरी नीट विचार केला तरी असे लक्षात येते कि जीवनातील एकंदर सुख व एकंदर दुःख यांचा तौलनिक विचार केला तर सुखाचे पारडे जड दिसते. वरवर पहिले व काही वैयक्तिक अनुभवाच्या स्मृती चे जागरण हेच दुःख अधिक आहे असे भासवते. स्वाभाविक मानसिक स्थितीत सुखच असते हे प्रत्ययास येते. दुःख नाही असे नाही. पण ते अस्वाभावीक स्वरूपात असते, काही काळ टिकणारे व स्वाभाविक आनंदाला वंचीत करणारे असते. दुःखा चे स्वरूप असे संमिश्र असते. दुःख हा निसर्गाचा स्वभाव दिसत नाही आपण अपवाद म्हणू. या अपवादात्मक कारणा मुळे दुःख जास्त आहे असे भासते.
एखाद्या शांत जलाशया मध्ये लहान दगड पडावा…दगड तळाशी निघूनही जातो, पण तळ्यावर तरंग आपला आभास करत रहातात. असेच काहीसे. सुख स्वाभाविक, नैसर्गिक असल्याने आपण त्याची कदर करत नाही असे वाटते. ते लक्षात घेत नाही. नैसर्गिक मिळणारे शरीर, दिवस, रात्र, आयुष्य अशा गोष्टींची जाणीव आपण ठेवतो का? सहज पणे मिळणारी सुखे… तब्येत चांगली असणे, सहज श्वासोश्वास, सहज पचन, झोप, विविध चवी, मित्र, सामजिक सुखे इत्यादी.
अस्तित्वाचे हे स्वाभाविक सुख नेहमीचे असते.
दुःख निर्मितीचे मूळ कारण हेच असते कि आपण आपली ओळख, आपले स्वातंत्र्य, व काळाचे भान विसरणे. दुःख हा भ्रम असतो हे समजणे. मूळ ईश्वरी ज्ञान स्व-अभिव्यक्तीच्या जाणिवेतून गतिमान जेंव्हा होते त्याच वेळी ते धन व ऋण भारित होते. अरुपाला रेखांकित करून विविध रूपे, अस्तित्वे साकारात येतात, विविध भेद निर्माण होतात जे दुःखाला कारण असतात.
खरे तर सम्पूर्ण निर्मिती हि “सत” च्या अभिव्यक्ती साठी “चीत” या शक्तीस्वरूपी महेश्वरीने, “माया” या स्वरूपात त्या परब्रह्माला नामरूपात आणले. हे सर्व मूलतः त्याच्याच आनंद, परम प्रेम स्वरूप गुणांची व्यक्तता असते.
आपल्या भारतात अध्यात्माचे पीक फार पूर्वी पासून फोफावत गेले आहे. परिणामतः आपल्याला असंख्य प्रकारचे साधक, व वेगवेगळ्या प्रकारच्या साधन तऱ्हा दिसतात. यापैकी बहुतेक जण आपणास साधायचे काय हे विसरतात. फक्त विपरीत वागण्यातच धन्यता मानतात.
कोणी योगा करतात, कोणी यज्ञ करतात, कोणी शास्त्राचा, मंत्रांचा अभ्यास करतात, कोणी उपवास करतात, शरीराला दमवतात, कोणी घरदार सोडून देतात, कोणी जटाधारी, तर कोणी भस्म लावून नग्न रहातात तर कोणी हट योगी. कोणी तीर्थयात्रा, देवदर्शन, प्रदक्षिणा, कर्मठ असतात. या विषयी लिहावे व बघावे तेवढे कमी आहे.या सर्व तऱ्हा जेंव्हा साधक पहातो तेंव्हा सामान्य माणूस गडबडतो. अशा मानसिकतेत संतांचे विचार अभ्यासावेत. एकनाथ महाराज, ज्ञानदेव, तुकाराम तथा रामदास स्वामी यांचा तत्वज्ञानी आधार घ्यावा.
जीवनात काही घटनांतून, निमित्ताने देवा विषयी जिज्ञासा निर्माण होते. देव भेटावा असे वाटते, आपले आयुष्य फुकट जात आहे असे जाणवते. हा पश्चात्ताप.
यातून मन शुद्ध होते, अर्थात आपल्या मन-बुद्धी ची ठेवण बदलणे हे काही सोपे काम नाही. आयुष्यभर जोपासलेल्या विविध अहंकाराच्या इच्छा व वासना मूळ पासून बदलणे हि काही सोपी गोष्ट नाही व ते केल्या शिवाय ईश्वरविषयी खरी भक्ती प्रेम निर्माण होत नाही. पश्चात्तापाने,अनुतापाने व्यक्तिमत्वाला हादरावे लागते. अनुताप हीच ईश्वरीकृपा होय असे एकनाथ, रामदास स्वामी म्हणतात. पश्चात्ताप झाला तरच माणूस वेगळे ,नवीन जीवन जगण्याचा निश्चय करतो.
ईश्वराचा योग्य मार्ग कळण्यासाठी श्रवण, वाचन याची गरज आहे. ज्याने देव पहिला अशा संतांची अथवा ग्रन्थ हेच गुरू मानून पुढे मनन फार आवश्यक असते. ज्ञान अंतरंगात स्थिर होण्यासाठी मनना सारखा दुसरा उपाय नाही.
मननातून विचारांना स्पष्टता येते व सहाजिकच कर्मात परिणामकारक बदल होतो. साधकाने आपल्या देवाची मानस पूजा करावी. संवाद साधावा. यातून ध्यानाची युक्ती साधते.अर्थात अहंकार पूर्ण जाण्यासाठी सम्पूर्ण शरणागतता हविच.जिज्ञासेपासून आत्मज्ञानापर्यंत साधकाला किती काळ जाईल याचे मोज माप नाही. जेवढा पश्चात्ताप तीव्र तेवढी साधना अधिक. “सुखंच में शयनम चमे” हि वृत्ती विद्वान, पंडित लोकांची. साधकाची नव्हे. तडकाफडकी बदल आपल्या सारख्या सामान्य साधकात होत नाही. अभ्यासाने व चिकाटीने हळू हळू सरकावे लागते. साधनेच्या पुर्णत्वासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागतेच.
“दान” हा विषय खरच विचार करण्या सारखा आहे. यात देण्याची वृत्ती आहे, यात सेवेची जाणीव पण असू शकते. दान देणारा व दान घेणारा या द्वैत भूमिका श्रेष्ठ व कनिष्ठ अशी विभागणी करते. यात अज्ञान, अहंकार, विविध वृत्ती या सर्वांचा संघर्ष घडू शकतो. योग्य अयोग्य हि भूमिका असू शकते. माणसाने याचा विचार करणे महत्वाचे कि माझ्या जीवनात याचे स्थान काय.
एका बाजूने खरतर आपण काही दानच करू शकत नाही. तरीही दान हि संकल्पना सनातन आहे. कुठल्याही गोष्टीचे दान आपण केंव्हा करू शकतो जेंव्हा ती आपली स्वयं सिद्ध असते.
जड स्वरूपाचा विचार केला तर आपण कुठलीच निर्मिती करू शकत नाही, जी केली अशी वाटते ती सर्वांच्या सहाय्याने असते म्हणून त्या देण्याला परतफेड अथवा ऋण मुक्तता म्हणू शकू. याकरिता हिंदू संस्कृतीत ज्ञान-दान ते हि यज्ञ स्वरूपात उच्च स्तरावरील दान सांगितले आहे.
अर्थात ज्ञान हे प्रथम ग्रहण लागते, नंतर चिंतन व मनन या प्रक्रियेतून त्याचा वैयक्तिक विस्तार करावा लागतो नंतकरावेर ते निरपेक्ष भावाने योग्य ठिकाणी पेरावे लागते. या सम्पूर्ण प्रक्रियेत कुठल्याही जड वस्तूचा सम्बन्ध येत नाही. तरीही हे दान निम्न स्तरावरचे च असते. अजून उच्च स्तरावर विचार केला कि असे लक्षात येते कि आपण जे आता पर्यंत कमावले आहे ते आपले प्रारब्ध, संचित व त्या मार्फत आलेला अहंकार.हे सर्व आपण दान देऊ शकतो परन्तु हे दान घेणारा या जगात कोण आहे? अर्थात कोणी नाही!
हां, एक जण आहे तो म्हणजे ईश्वर.!!
जर खरच हे आपण त्याला अर्पण केलं कि आपणच ईश्वर होतो.
या सारख मोठं दान या जगात दुसरे कुठलेही नाही.
बाकी सर्व, या जगात दान करता येतील पण हे सर्वात अवघड दान आहे.