काव्य​

🌸एकांती🌸

मी जाऊन बसलो,
हृदयाच्या एकांती !
तव सत्य सापडले,
मज या अवनीवरती !!

मी स्पर्शित होतो,
भाव भावना येथे !
दुःख मूळ जे,
ग्रासित होतो तेथे !

मी शोधित होतो सुख...
या जीवन पुष्पावरती !!
दुःख परागची ते,
चिकटत होते मम पंखा वरती !

मी प्राशीत होतो,
गन्ध-रस तो जेंव्हा !
नकळत तिरके काटे,
बोचत होते तेंव्हा !!

रक्ताच्या दुःखातुनी,
एकांती जाऊन बसलो !
हृदयाच्या अभिसरणातूनी,
सत्य बघतचि रमलो..!!

आत्मप्रवासी
स्वामीं स्वरूप स्वानंद

🌸आध्यात्मिक रसग्रहण🌸

या काव्यातून कवी आपल्या आध्यात्मिक मार्गाचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी ते एका भुंग्याचे उदाहरण देतात. भुंगा जसा पूर्ण एकाग्र होऊन फुलातील रस शोषून घेतो. ते घेताना त्याला फुलाचे काटे टोचतात, तरी तो एकाग्र चित्ताने त्या फुलातील रस शोषून घेतोच. त्याप्रमाणेच प्रत्येक साधक आपली साधना करताना अनेक संकटांना सामोरे जात असतो. त्याला भौतिक दुःखांचा सामना करावा लागतो. त्याच्या इच्छा वासना त्याच्या साधनेच्या आड येतात. त्याची मानसिक तडफड सुरु असते. पण गुरूंच्या मार्गदर्शनातून तो आपले मार्गक्रमण करीत असतो.

येथेच त्याच्या निष्ठेचा, त्याच्या श्रद्धेचा कस लागतो. त्याला गुरूवाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून गुरूप्रित्यर्थ समर्पित भाव ठेवावा लागतो. तो शाश्वत सुखाच्या शोधात असतो पण अज्ञान दशेत असल्याने दुःखच वाट्याला येते.

गुरूच्या आशिर्वादातून त्याला सोहम साधनेची खुण समजते. "मी ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म" हा बोध त्याला आपल्या अंतरंगात जागृत करायचा असतो. तो साधना करत असतो. ही साधना कुठे बाहेर नाही तर स्वतःच्या अंतरंगातून करायची असते. त्यासाठी तो आपल्या हृदयाच्या एकांतात शिरतो, म्हणजेच आपले आध्यात्मिक हृदय जे आहे (मन,बुद्धी,चित्त, अहंकार),त्याच्या आधारे तो आपली साधना सुरु करतो.

नाभीपासून ब्रह्मरंध्रात, सोहम भाव स्थिर करायला लागतो. मनाची एकाग्रता साधत, तो अग्रबुद्धीच्या जाणिवेतून मन-बुद्धीचे ऐक्य साधतो. येथे त्याच्या अंतरंगात विवेक , वैराग्याच्या जाणिवा स्थिर होतात व चित्त शुद्धी साधली जाते. त्याच्या इच्छा, वासना, त्याचा अहंकार गळून पडतो व तो आपल्या हृदयातील गुरुतत्वाशी एकरूपता साधतो. त्याला आत्मज्ञान झालेले असते. तो गुरुवाक्याचा अनुभव घेत त्यात रममाण होऊन जातो.

हाच त्या साधकाचा सोहम साधनेचा प्रवास आहे. हाच मन पवनाचा अंतरंगातून केलेला प्रवास आहे जो एकांती बसूनच करायचा आहे.

ईश्वर हा निर्गुण आहे ,म्हणूनच ईश्वराचा शोध ही अंतरंगातून करायचा आहे, एकांतात बसून करायचा आहे. साधना ही एकांतात करायची आहे. ईश्वराचे प्रेमस्वरूप स्वतःच्या अंतरंगातून ओळखून लोकांतात येऊन त्याची मुक्त उधळण करायची आहे. हेच ह्या एकांतात केलेल्या साधनेचे फलित आहे.

काव्य रसग्रहण : जयंती यारगोप

( दिव्योन्मेष सत्संग सदस्य, पुणे.)