| अभिप्राय |
|---|
| पावस शिबिर अभिप्राय १ |
| पावस शिबिर अभिप्राय २ |
नमस्कार, परमपूज्य स्वामी स्वरूपानंद आणि वंदनीय स्वामी स्वरूप आनंद यांना नमस्कार करून मी माझा अभिप्राय लिहीत आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रम व प्रवास यामुळे हा अभिप्राय लिहायला उशीर झालेला आहे त्यामुळे क्षमस्व...
खरे तर माझ्या आजवरच्या जीवनामध्ये अनेक क्षण असे आले की जे माझ्या स्वस्वरूपाची अथवा आत्मबोधाची जाणीव करून घेण्यासाठी मला प्रवृत्त करून गेले... परंतु देह बुद्धीचा हा प्रवास आत्मबुद्धी अथवा आत्मबोध पर्यंत एका दिवसात अथवा एका जन्मात तसे जाणे अशक्यच... (गुरुचे मार्गदर्शन आणि गुरुचा सहवास असेल तर काहीही शक्य होऊ शकते)...
परंतु सगळ्यात पहिल्यांदा माझी भेट स्वामी स्वरूप आनंद यांची त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी झाली होती आणि त्यावेळी त्यांच्या विचाराने मी नक्कीच प्रभावित झालो होतो कारण भगवद्गीतेतील सांख्ययोग आणि ज्ञानयोग याचा मी नेहमीच समर्थक राहिलो आहे... आणि मूर्ती पूजा कर्म कांड सगुण साकार रूपातील उपासना किंवा आपले कुलधर्म कुलाचार या सगळ्या गोष्टी मागचं जे तत्व आहे किंवा जे तत्त्वज्ञान आत्मज्ञान आहे त्या जाणिवेपर्यंत पोचल्याशिवाय आपण सगुण साकार रूपात देह बुद्धीने करत असलेल्या गोष्टींना काहीही अर्थ उरत नाही हे उमगले होते.
नुसते उपचार म्हणून जीवनातल्या काही गोष्टी आपण सातत्याने करत राहतो का तर परंपरेने त्या आपल्याकडे चालून आलेल्या असतात परंतु त्या मागचे विज्ञान आपण लक्षात घेत नाही आणि म्हणूनच पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे आपण त्याच त्याच प्रकारचे दुःख भोगत राहतो असे मला वाटते...
ज्योतिष शास्त्रामध्ये मुहूर्ताचे महत्त्व अनन्यसाधारण असते म्हणून मला इथे नमूद करावेसे वाटते की ज्ञानग्रहण करण्यासाठी परमपूज्य स्वामी स्वरूप आनंद यांनी निवड केली ती पावस येथील स्वामींच्या समाधीच्या मंदिराची जागा, मार्गशीष महिना ज्या महिन्याचा महिमा अगाध आहे, गुरुतत्त्व आत्मबोधाचे तत्व ज्या वातावरणात अत्यंत सहज पद्धतीने ग्रहणशील होईल असाच महिना आणि वास्तव्याचे ठिकाण निवडणे पण किती महत्त्वाचे असते हे यातून अधोरेखित होते... (ग्रहणशील वातावरण असणे हे किती महत्वाचे)
आपल्या अतिशय सहज आणि ओघवत्या वाणीने त्यांनी इतका अवघड विषय सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत अतिशय संयमाने मांडला... त्याचबरोबर त्यावर त्यांनी कुठल्याही इतर विचारधारेला अथवा परंपरेला दोष न देता आपले विचार ठेवले त्यामुळे हा विषय अगदी थेट मनात घुसतो.
प्रत्येक जीवात्म्याचा प्रवास हा वेगवेगळ्या स्तरावरती सुरू असतो प्रत्येकाच्या जाणिवा वेगवेगळ्या असू शकतात पण जेव्हा लांबचा प्रवास असतो तेव्हा आपल्या सोबत आपल्या विचारांची आपल्या भावनांशी मेळ खाणारी आणि आपल्या उद्दिष्टांशी साम्य असणारी व्यक्ती सोबत असतील तर त्या प्रवासाची मजा काही और असते आणि त्याचबरोबर तो प्रवास लवकर संपण्याची शक्यता पण दाट असते त्यामुळेच या देह बुद्धीच्या कडून आत्मबोधाच्या प्रवासामध्ये गुरुचा सहवास आणि गुरुचा सत्संग सोबत असेल तर आपण सर्वजण लवकरच त्या अंतिम लक्षात पर्यंत पोहोचू अशी खात्री वाटते.
पावस येथील तीन दिवसांमधील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण तिथल्या दिव्य स्पंदनांचा अनुभव मी वेळोवेळी अनुभवत होतो आणि त्याचबरोबर गुरुचे सानिध्य आणि गुरुचा सत्संग याचे महत्त्व अधोरेखित होत होते...
मायेच्या प्रभावामुळे देह बुद्धी सातत्याने आपल्यावरती अधिकार गाजवून आपल्याला स्व स्वरूपाचे भान विसरायला लावते म्हणूनच प्रवासामध्ये गुरुचे बोट आपल्या हातात असेल आणि गुरुचा सत्संग असेल तर आपल्याला स्व स्वरूपाचे ज्ञान लवकर होऊ शकते.
वारंवार अशा ठिकाणी असे ज्ञानयज्ञ होणार असतील तर त्यासाठी उपस्थित राहायला मला नक्की आवडेल त्यातून मनात उठणाऱ्या अनेक तरंगांना शांती देऊन जीवनाच्या खोलात शिरून स्वतःच्या स्व स्वरूपाची जाणीव लवकरात लवकर होऊन स्वतःचा उद्धार करण्याची तळमळ नक्की आपण परत एकदा जागृत केलीत त्याबद्दल स्वामी स्वरूप आनंद यांचे खूप खूप आभार🙏🏼👏💐
गजानन सुभाष देशपांडे
+91- 9975557217
10 डिसेंबर 2025
पुणे