साधनेची त्रिसूत्री

अनुताप

साधक जीवनात काही गोष्टी अनिवार्य पणे घडणे आवश्यक असते. अशा मन-बुद्धी च्या अनिवार्य जाणिवा म्हणजे साधक जीवनातील सूत्र. हे सूत्रच साधकाला त्याच्या अच्युत आत्मप्राप्ती कडे विकसित करत असते.

१) अनुताप:-

आपल्या मधील अज्ञानामुळे, अर्धवट ज्ञानामुळे, माहितीमुळे आपल्या जीवनात व्यावहारिक, तथा पारमार्थिक चुका घडत असतात. आपल्या मध्ये अहंकार जर घट्ट असेल तर विकृत मन त्या चुका अव्हेरते.

आपल्या हातून सहसा काही चुकत नाही अशी मानसिकता असते, त्यामुळे पुढचा विकास खोळंबतो. साधकाला साधनेत दक्ष राहून झालेल्या चुकांचे दुःख होणे अपेक्षित असते.

मनाच्या सूक्ष्म, अस्थिर अशा विविध स्तरांवर सतत आसक्तींची घालमेल होत असते. यम-नियम माहित असतात तरीही वृतींची ओढाताण त्याची एकाग्रता भंग करतात. चित्त समत्वाच्या जाणिवेत येत नाही. ईश्वर अजूनच दूर जातो.

भक्ती-प्रेमाच्या माध्यमातून ईश्वराला आळवावे. आपल्या सगुण ईश्वरा समोर अश्रू ढाळावेत.
हे भक्तीचे रुदन चित्त शुद्धी करते.
हाच अनुताप , ईश्वर प्राप्ती साठी.
“अनुदिनी अनुतापे तापलो राम राया”- रामदास स्वामी.
हा अनुताप साधकाला साधनेच्या विविध टप्प्यांवर साथ देत असतो. आपल्या मानसिकतेचे आत्मनिवेदन सतत त्या ईश्वराकडे करावेच लागते. साधनेचा तो अविभाज्य भाग असतो.

अश्रूंच्या त्या तप्त कणातून,
चित्त शुद्ध ते होतच गेले |
आत्मप्रभेच्या प्रकाशातून,
जीवन ते ही फुलतच गेले ||

अनुतापाचा आधार साधनी,
भाव विभोरता मम त्या जीवनी |
राम होऊनी कृष्ण जाणुनी,
आत्मप्रभेतच सर्व डोलवी ।।

निश्चय

अनुतापाच्या शुद्धतेतून चित्त हे भावविभोर होते. मन व बुद्धी सुक्ष्म अशा चिंतन, मनन या परिघात येत जाते. आध्यात्मिक भूमिका विचारांच्या प्रांगणात स्फुर्त रूप घेतात.

आपल्या जीवनाचा आधार, तसेच आपण नक्की कोण, आपली ओळख काय अशा अस्पष्ट अंधुक वलयांच्या आवर्तनात चित्त चिंतन करत राहते. यातूनच स्वरूप शोधाची तसेच आपल्या भोवतीच्या विश्व प्रांगणाची जिज्ञासा निर्माण होते. या जिज्ञासापूर्तीचा निश्चय सुरु होतो.

श्रवण, मनन, सत्संग यांच्या द्वारे निश्चयात्मक ध्येय चित्तात दृढ होत जाते.

'Who am I' ? हा प्रश्न तसेच हे विश्व व त्याचे नेमके स्वरूप याबद्दलच्या शोधाची दृढता, हा जीवनाचा, जीवन जगण्याचा अविभाज्य भाग होतो.

सर्व विकल्प दूर सारले जाऊन एकच निश्चयात्मक संकल्प तयार होतो.

ही साधकाची मानसिकता असते. बाह्य जीवन प्रारब्ध भूमिका निभावत तो जगत असतो. ही प्रारब्धाला सामोरे जाणारी मन-बुद्धीची स्थिती चित्तातील दृढ निश्चय बळकट करत जाते. आत्मप्राप्तीसाठी कठीण, घट्ट, दृढ निश्चयाची नितांत गरज असते. आपल्या जीवनातील विविध बाह्य तथा आतून वृत्तीतून तयार होणारी आकर्षणे, ओढ, आसक्ती यांना दूर सारणे ही काही सोपी गोष्ट नव्हे हे साधकाने ध्यानात धरणे गरजेचे असते. इथे आपले पृथ्वीवर प्राप्त झालेले सद्गुरुही उपयोगी पडत नाहीत. या करिता सद्गुरुंचे स्थान आपल्या हृदयात, आत्मस्थितीत शोधावे लागते.

‘मज हृदयी सद्गुरु, जेणे तारीलो हा संसारपुरु।
म्हणोनि विशेषें अत्यादरु, विवेकावरी ।।’

आपला आपल्यावरील आतून असणारा अंकुश महत्वाचा असतो. यासाठी निश्चय लागणार.

हा निश्चय असेल, खात्री असेल तर सहजपणे विवेक तयार होतो व कुठली गोष्ट टाळायची, नाकारायची ( rejection ) हे उमजते. ‘निश्चयाची’ गरज साधकाला अत्यंत असते, कारण ध्येयाची म्हणजेच आपल्या मधील ईश्वराची अनुभूती नसताना या मार्गावर चालावे लागते. आड येणाऱ्या क्षणांना, घटनांना दूर सारणे अथवा त्यातून आध्यात्मिक जीवन साधणे ही साधना म्हणजे तारेवरची कसरत असते.

या साठीच श्रवण, मनन, चिंतन हा आत्मसाधन मार्ग निश्चयाने चालावा लागतो.

या कारणे "निश्चय" हे प्रमुख दुसरे सूत्र होय. यातूनच पुढे बीज रुपात असणारे तिसरे सूत्र आकारास येते. अनुताप व निश्चय यांच्या रोजच्या आधाराने वाढणारे तिसरे सूत्र त्याचा अभ्यास पुढे करू

आत्मशोधाची शक्ती

अनुताप व निश्चय या दोन्ही सूत्रांचे चिंतन आपण केले. साधक जीवनाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी या सूत्रांचा म्हणजे आपल्या मधील जाणीव शक्तींचा साधकाला सतत उपयोग करावा लागतो. मन-बुद्धीला सत्संग, श्रवण, मनन, चिंतन यात ठेवावे लागते.

आपल्यामध्ये उत्कंठा, जिज्ञासा या शोधवृत्ती असतात. बुद्धीने ईश्वराविषयी ज्ञान घ्यावे. यासाठी या वृत्तींचा उपयोग करावा. ज्ञान थेट परब्रह्माचे द्वैत-अद्वैत जाणिवेतील प्रज्ञानमय स्वरूपापर्यंत घ्यावे. यातूनच खरा निदिध्यास सुरु होतो तो ही ज्ञानमय.

श्रवण, मनन, चिंतन हा आत्मज्ञानाचा साधन मार्ग म्हणतात त्याचे हेच कारण आहे.

ईश्वराबद्दलचे ज्ञान व यातूनच ईश्वरशोधाची वृत्ती निर्माण होते. हीच आत्मशोधाची शक्ती होय.

साधकाला ह्या शक्तीचा शोध त्याच्या आतमध्ये लावावा लागतो. ईश्वर प्राप्तीची खरी तळमळ हेच या शक्तीचे भक्तीत परावर्तित होणारे स्वरूप आहे.

या आत्मशोधाच्या शक्ती आधारेच आत्मा, विश्वात्मा तथा विश्वातीत स्वरूप होण्याचा, आत्मपूर्णत्वाचा योग मार्ग आहे.

कर्म, ज्ञान व भक्तीच्या एकत्रित ब्रह्म जाणिवा साधकाचा अविभाज्य भाग होतात. हाच पूर्णयोग.

यासाठी या त्रिसूत्रीची उकल साधक जीवनात करून घ्यावी लागते. अनुताप, निश्चय, आत्मशोधाची शक्ती.

त्रिसूत्रांच्या आधारातून,
साधक जीवन जगतच जावे |
“अनुतापाच्या” अश्रूमधुनी,
चित्त शुद्ध ते सदा असावे ||

श्रवण-मननी, एकाग्र होऊनी,
सत्संगी ते “निश्चयी” व्हावे |
ध्येय जाणीवे, ज्ञान घेऊनी,
प्रज्ञान जाणीवे स्थिरता यावे ||

अनुतापे, त्या निश्चयी राहुनी,
साधनेतून विज्ञानी कसे |
हृदयीगुरु तो कृपे मधूनी,
आत्मशक्तीत्वे सादर असे ||