ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग
ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग

किंमत :

आगामी प्रकाशन

Description :

"चतुःश्लोकी भागवत" हे भारतीय संस्कृतीतील सनातन असे साहित्य आहे. खरे तर हे साहित्य, निव्वळ साहित्य नसून, विश्व निर्मितीतील तत्त्वांच्या कर्मजाणिवांचा धर्म आहे. त्यामुळे चतु श्लोकी भागवत हे खरे तर, ससंवेद्य करूनच समजून घ्यावे लागते. विश्व निर्मितीच्या अगोदर सनातन अशा ईश्वरी ज्ञानमय क्रियात्मक जाणिवांचे, महाविष्णूंचे स्वरूप, जे आजही संपूर्ण ब्रम्हांड व्यापून विश्वातीत आहे, अशा या महाविष्णुंच्या शिवस्थितीत, वैश्विक निर्मितीचा जो संकल्प झाला, त्यातून त्यांच्यामधीलच रजोगुणात्मकता, ब्रह्मजाणिवेतून बाहेर आली.
याच ब्रह्मजाणिवेने आपल्या निर्मितीचे कारण शोधण्यासाठी, पुनश्च त्याच महाविष्णूच्या अंतरंग चतुष्टयाचा शोध घेतला व आपल्या निर्मितीचे कारण समजून घेतले. हाच चतुः श्लोकी भागवताचा "ससंवेद्य" करण्याचा भाग आहे.
यातील प्रमुख चार श्लोक हे ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याकरिता लागणाऱ्या ईश्वरीय नियमांच्या खुणा सांगण्यात आल्या आहेत. या आधारेच ब्रम्हांडाची निर्मिती झाली व या निर्मितीत कार्य करणाऱ्या ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती यांच्या कर्माचा धर्मही सांगण्यात आला आहे. तसेच हे कर्म करीत असताना, स्वतः कर्ता असणाऱ्या ब्रह्मदेवाने कुठल्या कर्माच्या धर्मांनी वागावे, जेणेकरून त्यांचा व महाविष्णूंचा अनुबंध कायम राहील, हेही सांगितले.
निर्मितीमधील अव्यक्त व व्यक्त अशा मूलद्रव्यांचा (महाभूतांचा) धर्मही ईश्वराने ठरविलेला आहे. तसेच निर्मितीमध्ये कार्य करणाऱ्या सर्व ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती, देवी देवता यांचाही आध्यात्मिक धर्म त्या त्या व्यक्ततेसाठी नियमित केलेला आहे. यातूनच पुढे चौऱ्याऐंशी लक्ष योनींची निर्मिती, ही प्रकृतीच्या ज्ञानजाणिवेची अभिव्यक्ती, काळजाणिवेत कशाप्रकारे स्थिर केलेली आहे, याचे कोडे आजही मानवास कळलेले नाही.
संपूर्ण निर्मिती एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी विकसित झाली, असा सिद्धांत मानवाने जरी मांडला असला, तरी तशी वस्तुस्थिती दिसत नाही. सर्व योनीतील सर्व निर्मिती आजही कालचक्रातून सुरूच आहे. माकडातून मानव असे असेल, तर आजही माकडे आहेत व मानवही आहे. काही शारीरिक साम्यता असू शकते, परंतु परिवर्तन हे मानसिकच असते, शारीरिक नव्हे! ब्रह्मदेवाने (महाविष्णूंच्या रजोगुणाने) जी सर्व निर्मिती केली, त्यात मानव प्राथमिक "मनु" हा तयार केला. मनु हे अतिमानसिक जाणिवेतील, विकसित क्षमता असलेले व मानवी शरीर धारण केलेले स्वरूप मानावे लागते. हा "हरिवंश" होय. यातूनच पुढे मानव योनी निर्माण झाली. मनुचा मानव हे "ज्ञानाकडून अज्ञानाकडे" ओढले गेलेले स्वरूप आहे. त्यामुळे आधुनिक मानवात पशुत्व, मानवत्व व ईश्वरत्व या सर्वच खुणा त्याच्या मनोमयतेत दिसतात. व्यक्त झालेले मानवस्वरूप हे, जन्म- जीवन- मृत्यू ह्या सृष्टीच्या नियमित व्यवस्थेत येते. जन्माच्या अगोदर व मृत्यूनंतर अव्यक्त जाणिवेत हरवलेले जिवात्म्याचे विश्व, हे मानवाला जरी रहस्य वाटत असले, तरी ब्रह्मदेवाने जिवात्म्याची "अव्यक्त विश्व योजना" नियमित केली आहे. स्वर्ग, पृथ्वी व पाताळ हे तीन लोक चौदा विभागांतून स्थायी केलेले आहेत.
ब्रह्मदेवाने स्वतः विश्वनिर्मिती करत असताना, ईश्वर होऊनच ईश्वराचे कार्य केले. त्यामुळे ब्रह्मदेवाचा कर्मयोग हा त्याच्याच ज्ञानयोगातून व भक्तियोगातून परिपुष्ट होऊन, त्यांनी "ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य योग" उपभोगला. ओम तत् सत् याच शास्त्राचा आधार, ब्रह्मदेवाने निर्मितीच्या कर्मासाठी घेतला. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये 17 व्या अध्यायात, ब्रह्मदेवांच्या या विशेष जाणिवांचा उल्लेख केलेला आहे. हाच विश्व निर्मितीतील "सनातन धर्म" होय, जो ब्रह्मदेवांनी जाणला, अनुभवला व स्वतः कर्मात आणला.
आधुनिक मानवाच्या समोर असणारा धर्म, हा त्याच्याच बुद्धीच्या खुज्या अशा जाणिवेतून, बहिर्मुखतेतून तयार होत आहे. या संपूर्ण विश्वनिर्मितीत मानवाने समजणे अगत्याचे आहे की, तो या सृष्टीचा / निर्मितीचाच एक भाग आहे. त्यास प्राप्त असणारे शरीर तथा त्याच्या आत कार्य करणाऱ्या सूक्ष्म शक्ती (अंतरंग चतुष्टय, ईश्वरी शक्ती इत्यादी) यांच्या आधारे आपल्या मनाचा विकास साधून त्याच्यातील सूक्ष्म आत्मचैतन्याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते व हाच त्याचा स्वतःचा शोध असतो.
बहिर्मुख जाणिवेतून विश्वनिर्मितीचा शोध शक्य होत नाही, हे आधुनिक शास्त्रानेही मान्य केले आहे! आधुनिक शास्त्रज्ञांनी आपल्या बुद्धीला तसेच तर्क जाणिवांना, प्रयोगांच्या आधारे फार मोठा ताण दिला व त्यातून विश्वचनेतील काही सूत्रे तथा नियम व कायदे यांचा जरूर प्रत्यय घेतला. परंतु, विश्वनिर्मात्याची तसेच स्वतःची खरी ओळख, मानवाला अजूनही करून घेता आली नाही, हे सत्य आहे. शेवटी, मानवाच्या उच्च विकसित मनोमयतेला द्रष्टेपण येणे आवश्यक असून व ही उच्च विकसित मनोमय आकांक्षाच, त्याला त्याच्या मूळ सत्यशोधापर्यंत घेऊन जाते. यासाठी बहिर्मुखता ही अनंता पुढे टिकू शकत नाही. "अंतर्मुख होणे" हीच मानवाची जीवनातील नेमकी गरज आहे.
मानवाने ब्रह्मज्ञान घेऊन, याच ब्रह्म साम्राज्यात आपले जीवन कसे बघावे, जगावे व कुठला धर्म साधनेतून जगावा, या सर्व प्रश्नांचा वेध या ग्रंथात घेतलेला आहे. प्रत्येक मानवाला कर्म ही करावेच लागणार. त्याच्यामध्ये प्रेम तथा ज्ञानाचे स्वरूपही दडलेले असतेच. मन-बुद्धीची व्यापकताच त्याच्या ज्ञानाला व प्रेमाला विकसित करू शकते. यासाठीच, प्रत्येक मानवाने ब्रह्मज्ञान घेऊन, ईश्वरीय प्रेमाच्या विकसित मनोमयतेमध्ये जाणे आवश्यक असते. हाच त्याचा कर्मयोग, ज्ञानयोग तथा भक्तीयोग असतो. या तीनही गोष्टी ईश्वरी होत जातात, तेव्हाच ब्रह्मदेवासारखा त्याचाही पूर्णयोग होतो आणि तो "ब्रह्म साम्राज्यातील ऐश्वर्य" उपभोगू शकतो, हाच आधुनिक मानवासाठी उपयुक्त असणारा "सनातन धर्म" नव्हे का?